One Nation, One Election: एक देश, एक निवडणूक; संसदीय समितीची उद्या पहिली बैठक !

नवी दिल्ली – एक देश, एक निवडणुकीच्या प्रस्तावाशी संबंधित २ विधेयकांच्या छाननीसाठी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करण्यात आली आहे. त्या समितीची पहिली बैठक उद्या (बुधवार) आयोजित करण्यात आली आहे.
देशात एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेण्याच्या विषयावर प्रदीर्घ काळपासून चर्चा सुरू आहे. तो प्रस्ताव वास्तवात आणण्याच्या उद्देशातून केंद्र सरकारने २ विधेयके आणली. हिवाळी अधिवेशनावेळी ती विधेयके लोकसभेत मांडण्यात आली.
अधिक चर्चा करण्यासाठी ती विधेयके जेपीसीकडे पाठवण्यात आली. सरकारने भाजपचे खासदार पी.पी.चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ३९ सदस्यीय जेपीसी स्थापन केली. त्यामध्ये प्रमुख पक्षांच्या खासदारांना सदस्य म्हणून स्थान देण्यात आले.
जेपीसीचे सदस्य असणाऱ्या ठळक नावांमध्ये कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी, आपचे नेते संजय सिंह, शिंदेसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे, तृणमूल कॉंग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी आदींचा समावेश आहे.
आता संबंधित समिती कामकाजासाठी सज्ज झाली आहे. पहिल्या बैठकीत कायदा आणि न्याय मंत्रालयाचे अधिकारी विधेयकांमधील तरतुदींची माहिती देणार असल्याचे समजते.





