nagar | विजेचा धक्का बसून एकाचा मृत्यू

नगर, (प्रतिनिधी) – विजेचा धक्का बसून एकाचा मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील कामरगाव शिवारात गुरुवारी (दि.४) रोजी घडली आहे. धनंजय जगन्नाथ कदम (वय ४४ रा. काष्टी, ता. श्रीगोंदा) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
धनंजय कदम हे गुरूवारी दुपारी कामरगाव शिवारातील भुजबळ यांच्या घरावर लोखंडी अँगलचे काम करत असताना त्यांना विजवाहक तारांचा धक्का लागून ते बेशुध्द झाले. त्यांना उपचारासाठी खासगी रूग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
तेथील डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषीत केले. तशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. बटुळे यांनी रूग्णालयात नेमणूकीस असलेले पोलीस अंमलदार जठार यांना दिली. अंमलदार जठार यांनी दिलेल्या खबरीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस अंमलदार खंडु शिंदे अधिक तपास करत आहेत.




