Electric Shock | गिझर रॉडचा वापर ठरला प्राणघातक! वडगावमध्ये दुर्दैवी अपघात

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – आंघोळीचे पाणी गरम करण्यासाठी बादलीत लावलेल्या गिझर रॉडचा शाॅक लागून एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. १८) सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली.स्वप्निल बाबाजी शेवाळे (वय २६, रा. वडगाव घेणंद, ता. खेड, जि. पुणे) असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीम नरके यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी आंघोळ करण्यासाठी स्वप्निल याने बादलीमध्ये रॉड गिझर लावला.
पाणी गरम झाले का, हे पाहण्यासाठी त्याने बादलीतमध्ये हात टाकला असावा. त्यामुळे शाॅक लागून स्वप्निल हा जागेवरच बेशुद्ध पडला. त्याचे तोंड बादलीमध्ये होते. ही बाब लक्षात येताच पाण्याचा गिझर बंद करून त्यास उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शवविच्छेदनाच्यावेळी स्वप्निल याचा व्हिसेरा प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला आहे.





