अकोले – जागतिक आदिवासी दिनानिमित्त शहरासह तालुक्यात आदिवासींचा जल्लोष उसळला होता. शहरात जवळपास 20 डीजेच्या तालावर तरुणाई उत्साहात मिरवणुकीत दंग झाली होती. मिरवणुकीत आ. डॉ. किरण लहामटे, युवा नेते मारुती मेंगाळ यांच्यासह आदिवासी नेत्यांनीही डीजेच्या गाण्यावर ठेका धरला होता.
दि. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने आदिवासी कृती समितीतर्फे शहरात मिरवणूक काढण्यात आली. आद्यक्रांतिवीर राघोजी भांगरे, राया ठाकूर,बिरसा मुंडा यांच्या प्रतिमा ट्रॉलीवर सजवून हातात आदिवासीचे झेंडे घेऊन एक तीर.. एक कमान.. सारे आदिवासी एक समान.. अशा घोषणांनी शहर दणाणले होते. बाजारतळापासून सुरू झालेली मिरवणूक महात्मा फुले चौकातुन पुन्हा बसस्थानकावर येऊन शेवट करण्यात आला. मिरवणुकीत आदिवासींचे पारंपरिक वेशभूषा केलेले तरुण सहभागी झालेले होते. या मिरवणुकीत आ. डॉ. किरण लहामटे, पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ, आमदार पत्नी पुष्पा लहामटे सहभागी झाले होते. मिरवणुकीत डीजेच्या तालावर आ. डॉ. लहामटे, युवा नेते मारुती मेंगाळ यांना कार्यकर्ते डोक्यावर उचलून घेत नाचत होते. आमदारांनीही डीजेच्या तालावर ठेका धरला होता.
शहरात बाजारतळाजवळ, बसस्थानक व महात्मा फुले चौकात स्टेज उभारून क्रांतिकारकांच्या प्रतिमा लावल्या होत्या. तेथे नेत्यांनी प्रतिमा पूजन केले. या वेळी अकोले शहर आदिवासीमय झाले होते. बसस्थानकावरील स्टेजवर आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिनींचे आदिवासी नृत्य झाले. या वेळी आमदारानी सर्वांना संबोधित करून मिरवणुकीची सांगता करण्यात आली.
आदिवासींचा नाद करायचा नाय…
आदिवासी समाजाला आद्यक्रांतिवीर राघोजी भांगरे, राया ठाकूर, बिरसा मुंडा यांचा वारसा आहे. वाघाच्या शेपटाला धरून ओढणारा आदिवासी समाज आहे. हा आदिवासी समाज कुणाच्या होऊन वाटेला जात नाही. तेव्हा नाद करायचा नाय.. जर कोणी वाटेला गेले तर त्याची खैर करत नाही, असे सांगून जागतिक आदिवासी दिनाचे महाराष्ट्रात नावलौकिक होईल, असा विश्वास आ. डॉ. किरण लहामटे यांनी व्यक्त केला.
कडेकोट पोलिस बंदोबस्त
जागतिक आदिवासी दिनाच्या मिरवणुकीसाठी अकोले पोलिस स्टेशनसह बाहेरील पोलिस स्टेशनचे 110 पोलिस कर्मचारी, 6 अधिकारी व एक दंगल नियंत्रण पथकाची तुकडी असा मोठा पोलिस बंदोबस्त पोलिस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली तैनात करण्यात आला होता.
निषेध मोर्चा आणि श्रद्धांजली
जागतिक आदिवासी दिन मिरवणुकीच्या सुरूवातीला देशातील मणिपूर राज्यात आदिवासी समाजावर घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन देऊन बाजारतळावर रायगडमधील इर्शाळवाडी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या आदिवासी बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली