पुणे जिल्हा | मोडकळीस आलेल्या घरकुलांचा विषय एरणीवर

अवसरी, (वार्ताहर) – मागील आठवड्यात आंबेगावच्या पूर्व भागातील पोंदेवाडी येथील सुलाबाई रणपिसे या महिलेचे घर तीनचार दिवस सलग पाऊस झाल्याने ढासळले. यात सुलाबाई यांना दुखापत झाली, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, यामुळे विविध घरकूल योजनांमध्ये निधीच्या अभावामुळे दुरुस्तीचे काम रखडलेल्या घरांचा विषय एरणीवर आला आहे.
महाराष्ट्र राज्यात दुर्बल, आर्थिक दुर्बल, मागास वर्ग, अपंग, तसेच सर्वसामान्य, अशा विविध घटकातील नागरिकांना शासनाकडून पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, तसेच विविध आवास योजनांमधून घरकुले मंजूर केली जातात. अनेक तालुक्यांत मागासवर्गीय तसेच इतर घटकांसाठी घरकूल मजूर होऊन बांधकाम केले जाते.
परंतु सर्वसामान्य (खुल्या) घटकातील गटातील आर्थिक दुर्बल गटातील नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेतून घरकूल मंजूर असले तरी निधीअभावी घराची बांधकामे रखडली आहेत. प्रशासनाने यावर सर्व्हे करून पावसाळ्याच्या दिवसांत धोकादायक घरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना लवकरात लवकर घरकूल बांधून देऊन दिलासा देण्याची गरज निर्माण झाली आहे.
शासनाने दरवर्षी धोकादायक घरांचे सर्व्हे करून तातडीने निधी मंजूर करावा. एखादी घटना घडल्यानंतर पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची वेळ येण्याअगोदरच कार्यवाही करावी. अशा दुर्घटनेत जीवित हानी झाल्यास नुकसान भरपाई देऊनसुद्धा नुकसान भरून निघणार नाही. याचा विचार करता प्रशासनाने दरवर्षी धोकादायक घरांच्या बांधकामासाठी किंवा दुरुस्तीसाठी आपत्कालीन परिस्थितीतील निधी उपलब्ध करून द्यावा.
उपाय केल्यास दुर्घटना टळतील
दरवर्षी पंतप्रधान घरकूल आवास योजना, यशवंत घरकूल योजना, यशवंत अपंग घरकूल योजना, शबरी आवास योजना व रमाई आवास योजना, अशा विविध योजनेतून नवीन घरकूल मंजूर करून बांधकामे केली जातात. प्रत्येक योजनेमधून प्रत्येक घटकासाठी निधी उपलब्ध व्हावा.
या आवास योजनेसाठी जसा स्वतंत्र निधी असतो, तसाच किंवा त्याच्या प्रमाणात घरकूल दुरुस्तीसाठी दरवर्षी प्रत्येक गावाला त्या त्या योजने अंतर्गत ठराविक निधी उपलब्ध करून द्यावा. हिवाळ्यानंतर धोकादायक घरांचे सर्व्हेक्षण करून त्यांना पावसाळ्याअगोदर निधी दिल्यास पावसाळ्यात घर पडून होणाऱ्या दुर्घटनांचे प्रमाण कमी होतील.





