Paris Olympics 2024 : तिरंदाजीत दीपिका-तरुणदीपर नजर! आज पात्रता फेरीपासून भारतीय मोहीमेची होणार सुरूवात…

Paris Olympics 2024 (Archery) :- पॅरिस ऑलिम्पिक अधिकृतपणे 26 जुलैपासून सुरू होणार असले तरी त्याच्या एक दिवस आधी गुरुवारी (दुपारी 1 वाजता), भारतीय तिरंदाज त्यांच्या मोहिमेला सुरुवात करतील. तिरंदाजी ही एक अशी स्पर्धा आहे ज्यामध्ये भारताला आतापर्यंत कोणतेही ऑलिम्पिक पदक जिंकता आलेले नाही. आता भारतीय तिरंदाज लेस इनव्हॅलिड्स गार्डन येथे पात्रता फेरीसह त्यांच्या मोहिमेची सुरुवात करतील. अनुभवी तरुणदीप राय आणि दीपिका कुमारी त्यांच्या चौथ्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील, संघाला पसंतीचा गट मिळविण्यासाठी पात्रतेमध्ये किमान टॉप 10 मध्ये स्थान मिळवावे लागेल.
1988 मध्ये ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजीचा समावेश करण्यात आला होता आणि तेव्हापासून भारतीय तिरंदाज जवळजवळ प्रत्येक ऑलिम्पिक खेळांमध्ये सहभागी होत आहेत. परंतु आतापर्यंत ते पदक जिंकूण व्यासपीठावर पोहोचण्यात ते अपयशी ठरले आहेत. लंडन ऑलिम्पिक 2012 नंतर पहिल्यांदाच सर्व सहा खेळाडूंचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. भारतीय पुरुष आणि महिला संघ क्रमवारीच्या आधारे ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. याचा अर्थ भारतीय तिरंदाज यावेळी पाच स्पर्धांमध्ये भाग घेतील.
पात्रतेनुसार प्राधान्य….
प्रत्येक तिरंदाज 72 बाण मारेल आणि पात्रता फेरीत सहभागी होणाऱ्या 53 देशांतील 128 खेळाडूंचे गुण रविवारपासून सुरू होणाऱ्या मुख्य बाद फेरीसाठी निश्चित केले जातील. भारतीय संघासाठी पात्रता फेरी महत्त्वाची ठरणार आहे. कारण, भारताला अनेकदा खालच्या सीडमध्ये स्थान मिळाले आहे, ज्यामुळे, बाद फेरीत दक्षिण कोरियासारख्या बलाढ्य संघाचा त्यांना सामना करावा लागला आहे.
दीपिका : दमदार ‘आई’
महिला गटात सर्वांच्या नजरा दीपिका कुमारीवर असतील. आई बनल्यानंतर 16 महिन्यांत तिने शांघाय येथे झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात रौप्य पदक जिंकून शानदार पुनरागमन केले. तिला महिला संघात साथ देण्यासाठी अंकिता भकट आणि भजन कौर आहेत. या दोघींसाठी हे पहिलेच ऑलिम्पिक असले तरी त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहेत.
रिकर्व्ह मिश्र्रमध्येही पदकाची संधी
धीरज आणि दीपिका क्रमवारीत अव्वल स्थानावर राहिले तर त्यांच्याकडून रिकर्व्ह मिश्र संघात पदकाची अपेक्षा केली जाऊ शकते. भारतीय तिरंदाजांना अद्याप ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीच्या पलीकडे प्रगती करता आलेली नाही. 2000 मध्ये झालेल्या एकमेव सिडनी ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजीमध्ये भारताला पात्रता मिळवता आली नव्हती. याशिवाय तिरंदाजांनी सर्व ऑलिम्पिक खेळांमध्ये भाग घेतला असला तरी त्यांना कामगिरीत सुधारणा करता आली नाही.





