Pimpri : धनुर्विद्येच्या जागतिक पातळीवर पिंपरी-चिंचवडचा डंका!

भोसरी : कॅनडातील विनिपेग येथे 19 ते 25 ऑगस्टदरम्यान झालेल्या जागतिक धनुर्विद्या युवक अजिंक्यपद स्पर्धेत पिंपरी-चिंचवडच्या शर्वरी शेंडे आणि प्रिथिका प्रदीप यांनी ऐतिहासिक कामगिरी करून भारताचा झेंडा जागतिक पातळीवर फडकावला आहे. शर्वरीचे सुवर्ण, प्रिथिकाचे रौप्य पदक पटकावले.
शर्वरी शेंडे हिने 18 वर्षाखालील रिकर्व प्रकारात उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या धनुर्धरावर 7-3 असा विजय मिळवला. उपांत्य फेरीत बलाढ्य कोरियाच्या अव्वल क्रमांकाच्या खेळाडूवर मात करत तिने अंतिम फेरी गाठली. थरारक अंतिम सामन्यात कोरियन धनुर्धराशी 5-5 अशी बरोबरी झाल्यानंतर टाय शॉटमध्ये शर्वरीने 10 गुणांचा अचूक निशाणा साधत सुवर्णपदक जिंकले. तसेच सांघिक प्रकारातही तिने कांस्य पदक पटकावले.
प्रिथिका प्रदीप हिने कंपाऊंड प्रकारात उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेवर 140-125 व उपांत्य फेरीत भारतीय खेळाडूवर 130-128 अशी मात करून अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात अमेरिकेविरुद्ध 140-143 असा अटीतटीचा पराभव स्वीकारत तिने रौप्यपदक मिळवले, तसेच सांघिक प्रकारात आणखी एक रौप्य पटकावले. दोघीही स्वराज्य आर्चरी अकॅडमीमध्ये प्रशिक्षक कुणाल तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. त्यांच्या या यशाने पिंपरी-चिंचवडच्या क्रीडाक्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे.





