अरे…यंदा हंडा मोर्चा, चर्चेच्या फैरीच “लॉकडाऊन’!

पुणे – एप्रिल सुरू झाला, की शहरात पाणी टंचाईच्या चर्चा सुरू होतात. आवर्तने, शेती-उद्योगांसाठी सोडलेले पाणी, पिण्यासाठी पाणी नाही, कमी दाबाने येणारे पाणी, टॅंकर नाहीत, जिथे आहेत तेथे गर्दी, धरणातील पाणी साठा, पाणी गळती, कॅनॉलमधून पाण्याची चोरी, हंडा मोर्चा, महापालिकेतील मुख्यसभेत चर्चेच्या फैरी, पाणी पेटले एक ना अनेक गोष्टी एप्रिल, मे आणि जून या महिन्यांत पहायला आणि ऐकायला मिळतात. परंतु यावेळी या चर्चा आणि “ऍक्टिव्हिटी’ही “लॉकडाऊन’ झाल्या आहेत.
यंदा उद्योगधंदे, कार्यालये बंद असल्याने आणि बहुतांश कामगार आपापल्या गावी निघून गेल्याने पाण्याचा वापर बराच कमी झाला आहे. यंदा धरणासाखळीतील खडकवासला, पानशेत आणि वरसगाव या तीन धरणांमध्ये 9.82 टीएमसी म्हणजे सुमारे 34 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे टंचाई जाणवणार नाही, असा अंदाज आहे. तर, दुरुस्तीच्या कामासाठी टेमघर धरण रिकामे करण्यात आले आहे. मागील वर्षी याच कालावधीत धरणांत पाणीसाठा कमी असल्याने पुणेकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. यंदा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 5 टीएमसी पाणी जास्त असल्याने पुणेकरांना पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवणार नाही. तरीही, लांबणाऱ्या पावसाळ्याचा विचार करता नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
पाण्याचे “वादळ’ फिके
जलसंपदा विभागातर्फे 31 जुलैपर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षीही चांगला पाऊस होईल, असा अंदाजही आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात आलेल्या पावसामुळे ओला दुष्काळ निर्माण झाला होता. धरणांतून तब्बल 20 टीएमसी पेक्षा जास्त पाणी सोडण्यात आले होते. चारही धरणांतून महापालिका तब्बल 18 टीएमसी पाणी उचलत असल्याचे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे. त्यावरून बरेच वादही झाले होते. मात्र, यंदा करोनाच्या वादळामुळे पाण्याचे वादळ फिके पडले आहे.




