पुणे | “लाडकी बहीण’चे पैसे परस्पर वळवले

पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दोन महिन्यांचे एकत्रित असे तीन हजार रुपयांची मदत थेट त्यांच्या बॅंक खात्यात जमा होत आहे. मात्र, काही महिलांच्या खात्यात जमा झालेली रक्कम बॅंकांनी कर्जापोटी वळती करून घेतली आहे. तर, काही बॅंकानी खात्यात किमान रक्कम (मिनिम्म बॅंक बॅलन्स) शिल्ल्क असल्याचे कारण देऊन ही रक्कम वळती केली.
तसेच दंडसुद्धा आकारला. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने कोणत्याही थकित कर्जाच्या बदल्यात ही रक्कम वळवू नये, तसेच ही रक्कम काढण्यास बॅंकांनी नकार देऊ नये, अशा सूचना राज्य शासनाने बॅंकर्स समितीला दिल्या आहेत.
या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना प्राप्त झालेली रक्कम काढता येत नसल्याचे समोर आले आहे. योजनेतून हस्तांतरित केलेले आर्थिक लाभ कोणत्याही थकित कर्जाच्या बदल्यात समायोजित केले जाऊ नये, कोणत्याही थकित कर्जाच्या बदल्यात समायोजित केले जाऊ नये. ही रक्कम विशिष्ट उद्देशासाठी असून ती इतर कर्ज समायोजनासाठी वापरता येणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
ही रक्कम त्याच्या खात्यात वर्ग केल्यानंतर लाभार्थी महिलांना कोणत्याही थकबाकीच्या समायोजनामुळे रक्कम काढण्यास नकार देण्यात येऊ नये.
काही लाभार्थ्यांकडे बँकेचे प्रलंबित असलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे बँक खाते गोठविण्यात आले असल्यास सदर बँक खाते तात्काळ सुरु करण्यात यावे व या योजनेतंर्गत मिळणारी रक्कम लाभार्थींना उपलब्ध करुन देण्यात यावी, असे शासनाने बॅंकाना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
या बाबतचे पत्र महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉ. अनूपकुमार यादव यांनी राज्यस्तरीय बॅंकर्स समितीचे समन्वयक बॅक़ आॅफ महाराष्ट्र यांना लिहले आहे. तसेच सहकार आयुक्त यांनी सर्व जिल्हा बॅंकांना या सूचनांची माहिती द्यावी, असे या पत्रात म्हटले आहे.




