Pune District : ‘ऑफर’ ठरली वाहतूक कोंडीला कारणीभूत; दुकानाच्या व्यवस्थापकावर गुन्हा
Pune District : दुकानाच्या उद्घाटनावेळी वाढणारी गर्दी आणि वाहनांची संख्या लक्षात घेऊन वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

वाघोली : दुकानाच्या उद्घाटनानिमित्त विविध ऑफर दिल्याने ग्राहकांची मोठी गर्दी झाली. ग्राहकांची गर्दी रस्त्यावर आल्याने तसेच दुचाकी व चारचाकी वाहने अस्ताव्यस्तपणे उभी केल्यामुळे पुणे-अहिल्यानगर मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचा प्रकार वाघोलीतील भाडळे वस्ती येथे घडला. याप्रकरणी ‘टेन्झ वस्त्रम’ या कपड्यांच्या दुकानाच्या व्यवस्थापकाविरुद्ध वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस अंमलदार नामदेव गडदरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुकानाचे व्यवस्थापक विराज विक्रम कुलकर्णी (वय 25, रा. वाघोली) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 285 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 23 रोजी भाडळे वस्ती येथे पुणे-अहिल्यानगर मार्गालगत ‘टेन्झ वस्त्रम’ या कपड्यांच्या दुकानाचे उद्घाटन झाले. उद्घाटनानिमित्त दुकानात विविध प्रकारच्या आकर्षक ऑफर जाहीर करण्यात आल्या होत्या. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. दुकानासमोर झालेली गर्दी रस्त्यावर आली.
त्यात ग्राहकांनी त्यांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांची मुख्य रस्त्यावर अस्ताव्यस्तपणे पार्किंग केल्याने पुणे-अहिल्यानगर मार्गावरील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. परिणामी या मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली. दुकानाच्या उद्घाटनावेळी वाढणारी गर्दी आणि वाहनांची संख्या लक्षात घेऊन वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याप्रकरणी दुकानाच्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी होण्याची शक्यता असलेल्या व्यावसायिक आस्थापनांनी उद्घाटन, विक्री किंवा विशेष सवलतीच्या वेळी वाहतूक व्यवस्थापनासाठी आवश्यक नियोजन करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.





