Pune District : भीमाशंकर मार्ग खड्डेमुक्त करण्यासाठी प्रशासनाची धडपड
Pune District : घोडेगाव ते तळेघर या सुमारे 33 किलोमीटर मार्गावरही खड्डे भरण्याचे काम सुरू असून, खेड ते शिरसगाव मार्गावरील दुरुस्तीचे कामही प्रगतीपथावर आहे.

तळेघर : मुसळधार पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था होत असतानाही भीमाशंकर-तळेघर-घोडेगाव मार्गावरील खड्डे बुजविणे आणि रस्ता दुरुस्तीचे काम प्रशासनाकडून गेल्या 15 दिवसांपासून सातत्याने सुरू आहे. नव्याने खड्डे पडत असतानाही तातडीने दुरुस्ती करून वाहतूक सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.
तळेघर ते भीमाशंकर या सुमारे 14 किलोमीटर लांबीच्या मार्गावर आतापर्यंत जवळपास अडीच हजार खड्डे बुजविण्यात आले असून संपूर्ण मार्गावर दुरुस्ती करण्यात आली आहे. पावसामुळे नव्याने पडणारे खड्डे तसेच खराब झालेल्या रस्त्याच्या भागांची पुन्हा दुरुस्ती केली जात आहे. काही ठिकाणी पेव्हिंग ब्लॉकचाही वापर करण्यात येत आहे. घोडेगाव ते तळेघर या सुमारे 33 किलोमीटर मार्गावरही खड्डे भरण्याचे काम सुरू असून, खेड ते शिरसगाव मार्गावरील दुरुस्तीचे कामही प्रगतीपथावर आहे.
सुरुवातीला खड्डे भरण्यासाठी जीएसबी साहित्याचा वापर करण्यात आला होता. मात्र, पावसाच्या पाण्यामुळे हे साहित्य वाहून गेल्याने आता कठीण मुरूमाचा वापर करून खड्डे भरण्यात येत आहेत. कामाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी संबंधित अभियंते दररोज प्रत्यक्ष स्थळी उपस्थित राहून पाहणी करीत आहेत. पावसाची उसंत मिळाल्यानंतर खराब झालेल्या रस्त्याच्या लांबीचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
भीमाशंकर मार्गावरील खड्डे भरण्याच्या कामाला चांगली गती मिळाली आहे. प्रशासनाने पावसातही काम सुरू ठेवले, ही समाधानाची बाब आहे. लवकरच रस्ता पूर्णपणे खड्डेमुक्त होऊन प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा, ही अपेक्षा आहे.
– योगेश मेंगडे, उद्योजक, मेंगडेवाडी





