Pune District : तंटामुक्त समिती अध्यक्ष निवडीवरूनच तंटा
Pune District : निवड पारदर्शक पद्धतीने व्हावी, यासाठी मतदान अथवा चिठ्ठी पद्धतीने निवड करण्याचा पर्याय सरपंचांनी मांडला; मात्र या पद्धतीला काही ग्रामस्थांनी विरोध केल्याने ग्रामसभेतील वातावरण काही काळ तापले.

मंचर : गावातील वाद गावाच्या पातळीवरच सामोपचाराने मिटविण्यासाठी शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची संकल्पना राबविली. मात्र, याच समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून निरगुडसर येथे ग्रामसभेत मतभेद निर्माण झाल्याने ’तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष निवडीवरूनच तंटा’ अशी चर्चा आंबेगाव तालुक्यात रंगली आहे.
निरगुडसर येथे लोकनियुक्त सरपंच रवींद्र वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी ग्रामसभा झाली. यावेळी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदाचा विषय चर्चेला आला. अध्यक्षपदासाठी तब्बल 21 इच्छुक असल्याने निवड प्रक्रियेबाबत सुरुवातीपासूनच उत्सुकता होती. निवड पारदर्शक पद्धतीने व्हावी, यासाठी मतदान अथवा चिठ्ठी पद्धतीने निवड करण्याचा पर्याय सरपंचांनी मांडला; मात्र या पद्धतीला काही ग्रामस्थांनी विरोध केल्याने ग्रामसभेतील वातावरण काही काळ तापले.
चर्चेदरम्यान सरपंच रवींद्र वळसे पाटील काही वेळासाठी सभागृहाबाहेर गेले. त्यांच्या अनुपस्थितीत उपस्थित ग्रामस्थांनी आवाजाच्या पद्धतीने युवराज हांडे यांची अध्यक्षपदी, तर चंद्रकांत गायकवाड यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले. मात्र, या निवड प्रक्रियेवर सरपंचांनी आक्षेप घेतला आहे. आपली अनुपस्थिती असताना झालेली निवड नियमबाह्य असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे ग्रामसभेत झालेल्या निवडीच्या वैधतेबाबत आता प्रश्न उपस्थित झाला आहे.
गावातील तंटे सामोपचाराने मिटविण्याचे उद्दिष्ट असलेल्या समितीच्या अध्यक्ष निवडीवरूनच वाद निर्माण झाल्याने ही ग्रामसभा सध्या तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे. निवड प्रक्रियेबाबत पुढील निर्णय काय होतो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
अध्यक्षपदासाठी 21 इच्छुक होते. त्यामुळे सर्वांना समान संधी मिळण्यासाठी निवड मतदान किंवा चिठ्ठी पद्धतीने पारदर्शकपणे व्हावी, अशी माझी भूमिका होती. माझ्या अनुपस्थितीत झालेली निवड नियमानुसार नसल्याने मी आक्षेप घेतला आहे.
-सरपंच रवींद्र वळसे पाटीलग्रामसभेत उपस्थित ग्रामस्थांनी आवाजाच्या पद्धतीने माझी अध्यक्षपदी निवड केली आहे. ग्रामस्थांनी दाखविलेला विश्वास ही माझी जबाबदारी आहे. गावातील वाद संवादातून मिटवून शांतता आणि सलोखा राखण्यासाठी काम करणार आहे.
-युवराज हांडे, नवनिर्वाचित अध्यक्ष





