Pune District : स्मार्ट मीटरमधून संतापाचा वाढीव धूर
Pune District : दरम्यान, ग्रामस्थांनी मागण्या मान्य करण्यासाठी महावितरण प्रशासनाला ५ सप्टेंबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे.

नीरा : पुरंदर तालुक्यातील नीरा – शिवतक्रार परिसरातील ग्रामस्थांनी महावितरणच्या कथित गलथान कारभाराविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या दोन ते चार महिन्यांपासून अनेक ग्राहकांचे मीटर रीडिंग न घेताच वीजबिले आकारल्याने आता ग्राहकांना मोठ्या रकमेच्या वाढीव बिलांचा सामना करावा लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या समस्यांसह स्मार्ट मीटर बसविण्याच्या मुद्द्यावरून ग्रामस्थांनी महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढून अधिकाऱ्यांना निवेदन दिले. दरम्यान, ग्रामस्थांनी मागण्या मान्य करण्यासाठी महावितरण प्रशासनाला ५ सप्टेंबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे.
नीरा-शिवतक्रार ग्रामपंचायतीने परिसरात स्मार्ट मीटर बसवू नयेत, असे लेखी पत्र तसेच ठरावाद्वारे कळविले असतानाही ग्राहकांच्या घरांमध्ये स्मार्ट मीटर बसविल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. ग्रामपंचायतीच्या पत्राची व ठरावाची दखल न घेता स्मार्ट मीटर बसविल्याने ग्रामस्थांत संतापाची लाट उसळली आहे. विनापरवानगी बसविलेले स्मार्ट मीटर तातडीने काढून पूर्वीचे मीटर पुन्हा बसवावेत, अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, प्रत्यक्ष वीज वापराच्या युनिटच्या रकमेव्यतिरिक्त वीज बिलामध्ये आकारण्यात येणारे विविध कर, शुल्क व इतर आकार अवाजवी असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला. प्रत्येक ग्राहकाला बिलातील सर्व आकारणीचा सविस्तर तपशील द्यावा, कोणत्या कारणासाठी किती रक्कम आकारली जाते, याची स्पष्ट माहिती ग्राहकांना मिळावी, अशी मागणी केली.
स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वाढलेल्या बिलांची तातडीने तपासणी करून दुरुस्ती करावी, बिलांची दुरुस्ती होईपर्यंत कोणत्याही ग्राहकाचे वीज कनेक्शन तोडू नये, अशी मागणीही निवेदनातून केली आहे. यावेळी महेश जेधे, टी. के. जगताप, मंगेश ढमाळ, सुधीर शहा, संतोष मोहिते, चंद्रशेखर पवार, पी. एल. निगडे, अरविंद जेधे, शुभम ढावरे, नीरा-शिवतक्रार परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बेमुदत ठिय्या आंदोलन करू
ग्रामस्थांनी महावितरणला (दि.५) सप्टेंबरपर्यंत मागण्या पूर्ण करण्याची मुदत दिली आहे. या कालावधीत मागण्या मान्य न झाल्यास मंगळवार, (दि.८) सप्टेंबरपासून नीरा-शिवतक्रार कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचे ग्रामस्थांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे.
विज बिल जर चुकीचे असेल तर ग्राहकांना दुरुस्त करून दिले जाईल. त्याचबरोबर ग्रामस्थांनी ज्या मागण्या केल्या आहेत, त्या मागण्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवल्या जातील. त्यावर जो निर्णय होईल त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल.
शरद आवताडे (उपकार्यकारी अभियंता,नीरा )





