Pune District : भैरवनाथ विद्यालयाचा गळणारा स्लॅब नव्याने बांधला
Pune District : रिहे येथील भैरवनाथ विद्यालयात इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत सुमारे 467 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जवळपास 200 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

पिरंगुट : रिहे (ता. मुळशी) येथील भैरवनाथ विद्यालयाचा गळणारा स्लॅब अखेर नवयुगा कंपनीकडून सामाजिक बांधिलकीतून पूर्णपणे नव्याने बांधून देण्यात आला आहे. आमदार शंकर मांडेकर यांनी कंपनीच्या अधिकार्यांकडे केलेली विनंती आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा तसेच स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश आल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुळशी तालुक्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या जोरदार अतिवृष्टीचा फटका रिहे येथील भैरवनाथ विद्यालयाला बसला होता. मुसळधार पावसामुळे शाळेचा स्लॅब गळू लागल्याने वर्गखोल्यांमध्ये पाणी साचत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. या परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर आमदार शंकर मांडेकर, सभापती मंदा शेळके, तहसीलदार विजयकुमार चोबे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, राष्ट्रवादीचे नेते बाबाजी शेळके, माजी सरपंच अनिल मोरे यांच्यासह ग्रामस्थांनी शाळेची पाहणी केली होती. विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शैक्षणिक वातावरण लक्षात घेऊन शाळेची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली.
रिहे येथील भैरवनाथ विद्यालयात इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत सुमारे 467 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जवळपास 200 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे शाळेच्या इमारतीची दुरुस्ती तातडीने होणे आवश्यक होते. आमदार मांडेकर यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत नवयुगा कंपनीने सुरुवातीला स्लॅबच्या दुरुस्तीसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, शाळेची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन केवळ साहित्य देण्याऐवजी संपूर्ण स्लॅबचे काम करून देण्याची विनंती करण्यात आली. त्यानंतर नवयुगा कंपनीने सामाजिक बांधिलकी जपत संपूर्ण स्लॅब नव्याने बांधून दिला.
सभापती मंदा शेळके यांनीही शाळेची पाहणी करून आमदार मांडेकर तसेच संबंधित अधिकार्यांसमोर विद्यार्थ्यांच्या अडचणी मांडल्या होत्या. त्यानंतर संबंधित यंत्रणा आणि कंपनीशी सातत्याने समन्वय साधत काम पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. अखेर शाळेच्या स्लॅबचे काम पूर्ण झाल्याने विद्यार्थ्यांना पावसाळ्यातील मोठ्या समस्येतून दिलासा मिळाला आहे. नवयुगा कंपनीचे संचालक उपाध्यक्ष के. वेंकट श्रीधर, उपमहाव्यवस्थापक श्रीनिवास कोटीगिरी, शाम साळुंके आणि नागेंद्र बाबू यांनी या कामासाठी विशेष सहकार्य केले.





