पुणे जिल्हा | दादांना पुरंदर-हवेलीत पोषक वातावरण?

सासवड, {अमोल बनकर} – बारामती विधानसभा मतदारसंघामधून अजित पवार हे उमेदवारी लढणार नसल्याचे संकेत मिळत असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघाची चाचपणी केल्याची देखील चर्चा आहे.
पुरंदर-हवेलीमधून अजित पवार यांनी निवडणूक लढल्यास अनेक बंडखोरांची तलवार म्यान होऊ शकते, अशी चर्चा पुरंदरच्या राजकीय वर्तुळामध्ये आहे.
पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणूक लढवावी यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी अजित पवार यांच्या सोबत दोन बैठका केले असल्याची चर्चा असून यामध्ये अजित पवार यांनी उमेदवारी दाखल केल्यानंतर महायुती मधील बंडखोरी कमी होऊन आघाडीमधील देखील काही उमेदवार बंडखोरी करणार नसल्याची चर्चा आहे.
तर महाविकास आघाडीतील अनेक नेते हे अजित पवार यांना मदत करू शकतात पुरंदरमधून निवडणूक लढली तर 50 हजारांचे मताधिक्य देऊ असे विधान कामठे यांनी केले होते.
महाविकास आघाडीकडून आमदार संजय जगताप यांना तर महायुतीमधून माजी मंत्री विजय शिवतारे यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत असले तरी महायुती, महाविकास आघाडीतून अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. त्यामुळे बंडखोरी रोखण्यासाठी अजित पवार यांनी निवडणूक लढली पाहिजे, अशी चर्चा पुरंदरमध्ये आहे.
पुरंदर-हवेलीचे माजी आमदार अशोक टेकवडे यांच्याकडून मात्र निवडणूक लढणार किंवा नाही याबाबत कोणतेही स्पष्ट संकेत मिळत नसल्याने त्यांची भूमिका ही गुलदस्त्यात आहे; परंतु अशोक टेकवडेंच्या काळामध्ये अनेक मोठी विकासकामे झाली होती.
त्याच काळामध्ये पुरंदरसाठी अजित पवार यांनी मोठा निधी अशोक टेकवडे यांच्या माध्यमातून दिला होता. त्यामुळे अशोक टेकवडे व अजित पवार यांचे अतिशय घनिष्ठ संबंध असल्याने अशोक टेकवडे देखील अजित पवारांचा प्रचार जोमाने करतील अशी चर्चा आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे यांच्याकडून निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला द्या, अशी मागणी पक्षाकडून करण्यात आली असून 2004 मध्ये ही जागा राष्ट्रवादीकडे होती.
माजी मंत्री दादा जाधवराव यांचा पराभव करून अशोक टेकवडे यांना निवडून आणण्याचे काम अजित पवार यांनी केले होते, त्यामुळे या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस दावा करून महायुतीकडे उमेदवारी मागू शकते व संजय जगताप यांना निवडून आणण्यामध्ये देखील अजित पवारांचा वाटा महत्त्वाचा होता.
त्यामुळे पुरंदर-हवेली विधानसभेची राष्ट्रवादीला मिळाल्यानंतर अजित पवार या ठिकाणावरून लढू शकतात असे देखील चर्चा आहे.
…तर शिवतारे तलावर म्यान करणार? (फोटो विजय शिवतारे)
अजित पवार यांना मैत्री काय असते हे दाखवणार असल्याचे विधान विजय शिवतारे यांनी केले होते यामुळे अजित पवार यांनी पुरंदरमधून निवडणूक लढवली तर विजय शिवतारे आपली तलवार म्यान करून अजित पवारांचा प्रचार करतील का? अशी चर्चा रंगत आहे.
झुरंगेही इच्छुक पण… ( फोटो दिंगबर दुर्गाडे, दत्ता झुरंगे)
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्यानेच प्रवेश केलेले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्ता झुरंगे यांनी निर्धार मेळाव्यामध्येच दिगंबर आणि दत्त हे एकच आहे
त्यामुळे प्रथम गुरूला उमेदवारी मिळाली पाहिजे; परंतु यामध्ये काही अडचण आल्यास मी निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. असे व्यासपीठावरून सांगितल्याने दत्ता झुरंगे यांनी विधानसभा लढणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले.
झेंडेंचा पत्ता कट की बंडखोरी? (फोटो संभाजी झेंडे)
महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाकडून माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे तयारी करीत असून बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र काँग्रेस सोबत आघाडीचा धर्मपाळू असे स्पष्टपणे सांगितले असून संभाजी झेंडे यांचा पत्ता कट केल्याची चर्चा आहे तर झेंडे बंडखोरी करणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे.
महाआघाडीतून संजय जगतापच?
पुरंदर-हवेलीमधून आमदार संजय जगताप यांनी विधानसभेसाठी तयारी सुरू केली असून खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र आघाडीचा धर्म पाळणार असल्याचे विधान केल्यामुळे संजय जगताप यांनी जनतेशी संपर्क वाढवण्या बरोबरच विकासकामांचा धडाका सुरू केला आहे.
तर महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार विजय शिवतारे यांनी माझी मुलगी ममता लांडे शिवतारे निवडणूक लढणार नसून पुरंदर-हवेली विधानसभा मीच लढणार आहे,असे विधान करून ममता लांडे यांच्या उमेदवारीला पूर्ण विराम देत स्वतः तयारी सुरू केली आहे.





