गाडीपेक्षा नंबर भारी! पसंतीच्या नंबर प्लेटसाठी पुणेकरांनी मोजले सव्वादोन कोटी रुपये

प्रभात वृत्तसेवा
पुणे – दिवाळीच्या मुहूर्तावर वाहन खरेदीबरोबरच, त्या वाहनांचा पसंती क्रमांक घेण्यासाठी वाहनमालकांची लगबग पाहायला मिळत आहे. विशेषत: व्हीआयपी क्रमांकासह वाढदिवस किंवा अन्य पसंतीच्या तारखेवर क्रमांक घेण्यास पसंती दर्शवली जात असून, त्यातून प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उत्पन्नात भरीव वाढत होत आहे. गेल्या दहा दिवसांत जवळपास १ हजाराहून अधिक वाहनमालकांनी पसंती क्रमांक घेण्यासाठी अर्ज केले आहेत. यंदाची आकडेवारी मागील दोन वर्षांच्या तुलनेने सर्वाधिक नाेंदविल्याचे आरटीओ प्रशासनाकडून सांगण्यात आले.
केंद्र सरकारने वाहनांवरील जीएसटी कमी झाला आणि दुचाकी वाहनांसह चारचाकी वाहन खरेदीचा वेग वाढला, तसेच व्यावसायिक वाहने घेण्याची संख्याही वाढताना दिसत आहे. दसऱ्यालाही गतवर्षीपेक्षा कार खरेदीची संख्या एक हजाराने वाढल्याचे दिसून आले. दिवाळीला धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीजेच्या मुहूर्तावर वाहन खरेदी केली जाते. यंदा १३ हजारांहून अधिक वाहन विक्रीच्या नोंदी झाल्या आहेत.
त्यामध्ये पुणेकरांचा नवे वाहन खरेदी करताना पसंतीचा क्रमांक (चॉइस) घेण्याचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. एकाच क्रमांकासाठी एकाहून अधिक अर्ज आल्याने पसंती क्रमांक घेण्यासाठी लिलावातही जोरदार चुरस होत आहे. यंदा पुणेकरांनी पसंतीच्या क्रमांकासाठी सव्वादोन कोटी रुपयांहून अधिक खर्च केले आहेत. यामुळे आरटीओच्या उत्पन्नात भर पडत आहे.
“पसंती क्रमांक घेण्यासाठी वाहनमालकांची नेहमीच मागणी असते. यंदा त्यामध्ये वाढ झालेली दिसली. पसंती क्रमांक घेण्यासाठी १ हजार २०० हून अधिक जणांनी अर्ज केला होता. त्यामुळे पुणे आरटीओला सव्वादोन कोटी उत्पन्न मिळाले आहे.”
– स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे





