Maharashtra Assembly Elections 2024 – राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत बहुतांश उमेदवार हे विद्यमान आमदार असून यात काही नवीन चेहरे हे राजकीय कुटुंबातील आहेत. भाजप हा विचारांवर चालणारा पक्ष असल्याचा दावा केला जातो. तसेच भाजपकडून कॉंग्रेसवर सातत्याने घराणेशाहीचा आरोप करण्यात येतात. परंतु आता भाजपमध्येही सर्रास राजकीय घराणेशाही सुरू असल्याचे दिसून येत आहे. केंद्रामध्ये भाजपने सलग तिसऱ्यांदा सत्ता काबिज केली आहे. मागील काही वर्षे राज्यामध्ये देखील भाजप सत्तेवर आहे. उद्धव ठाकरेंच्या मंत्रिपदाचा कार्यकाळ सोडल्यास भाजप २०१४ नंतर कायम सत्तेत राहिला आहे. केंद्रासह आता राज्यामध्ये भाजपमध्ये राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांना किंवा जवळच्या व्यक्तींना उमेदवारी देण्यास सुरुवात झाली आहे. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माजी आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते आणि गणपत गायकवाड यांची पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे, पक्षाचे नेते धनंजय महाडिक यांचे बंधू अमल महाडिक, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांचे नातू संभाजी पाटील निलंगेकर यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यपाल हरिभाऊ जावळे यांच्या कुटुंबात अमोल जावळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. श्रीजया अशोक चव्हाण भाजपकडून पहिल्या यादीमध्ये भोकरमधून श्रीजया चव्हाण यांना संधी देण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेशानंतर लगेचच त्यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली. राज्यामध्ये राजकारण करणाऱ्या अशोक चव्हाण यांच्या मुलीला श्रीजया चव्हाण यांना भाजपकडून मैदानात उतरविण्यात आले आहे. शंकर जगताप भाजपकडून पिंपरी-चिंचवड मतदारसंघासाठी दिवंगत नेते लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना संधी देण्यात आली आहे. दोन सख्खा भावांना संधी भाजपचे आशिष शेलार यांना वांद्रे पश्चिम या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्याचबरोबर आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांना मालाड पश्चिम या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. राज्यात सख्खे भाउ एकाचवेळी दोन मतदारसंघात निवडणूक लढणार आहेत. राहुल प्रकाश आवाडे इचलकरंजीमध्ये विद्यमान प्रकाश आवाडे हे अपक्ष आणि भाजप सहयोगी आमदार आहेत. आता आवाडे यांच्या मुलाला भाजपने इलचकरंजीमध्ये उमेदवारी जाहीर केली आहे. राहुल आवाडे यांना इचलकरंजीमधून भाजपने पहिल्या यादीमध्ये उमेदवारी जाहीर केली आहे.