आता पुण्यातही मराठी बोलण्यावरून वाद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल, वाघोलीत नेमकं काय घडलं?

पुणेः नुकताच काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच ट्रेंडिगमध्ये होता. मुंबईतील एका एरेटेल गॅलेरीत आलेला तरुण या गॅलेरीत काम करणाऱ्या महिलेला मराठीत बोलण्यास सांगतो. यानंतर मी मराठीत का बोलू असे उद्धट उत्तर काम करणारी महिला देते. यानंतर मराठी बोलण्यावरून वाद होतो. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. अनेकांनी महाराष्ट्रात मराठी बोलताच आली पाहिजे, असे मत मांडले. या घटनेनंतर संबंधित महिलेला सोशल मीडियावर माफी मागितली होती.
ही घटना ताजी असतानाच आता पुण्यातही मराठी बोलण्यावरून वादाची घटना घडली आहे. एकीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असून दुसरीकडे मात्र विद्येच्या माहेरघरातच हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही घटना वाघोलीतील डी मार्टमध्ये घडल्याची माहिती आहे.
व्हायरल व्हिडिओत काय?
वाघोलीतील डी-मार्टमध्ये एका व्यक्तीला मराठीत बोलण्यासाठी आग्रह केला असता, मी हिंदीत बोलणार असं सांगत त्याने मराठी बोलण्यास नकार दिला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडिओत ‘हिंदीच बोलणार’. जेव्हा ती व्यक्ती त्याला पुन्हा एकदा मराठी बोलण्यास सांगते तेव्हा तो म्हणतो, ‘नाही बोलणार. तू सोशल मीडियावर टाक. ही तुझी पद्धत चुकीची आहे’. यादरम्यान तो संतापतो आणि तू अशा प्रकारे व्हिडीओ शूट करु शकत नाही सांगतो. ‘तू मला विचारल्याशिवाय व्हिडीओ शूट करु शकत नाही,’ असं तो सांगत असल्याचे या व्हायरल व्हिडिओत दिसत आहे.
Pune Viral Video
'Hindi Hi Bolenge': Man insists on speaking Hindi after being asked to speak Marathi at D-Mart in Wagholipic.twitter.com/w1yhi1qnH4
— Pune First (@Pune_First) March 13, 2025
१३ मार्च रोजी ही घटना वाघोलीतील डी मार्टमध्ये घडली असल्याचे सांगण्यात आले आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी संमिक्ष प्रतिक्रिया दिल्या आहेत. महाराष्ट्रात राहत असेल तर त्याला मराठी आलं पाहिजे असं एका व्यक्तीने म्हटलं आहे, तर काहींनी एखाद्या व्यक्तीला जी भाषा सर्वोत्तम येते तीच बोलली पाहिजे असं मत मांडलं आहे. यामुळे व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर दोन्ही प्रकारच्या कमेंट्स आल्या आहेत.





