मुंब्रा अपघातानंतर रेल्वेचा मोठा निर्णय ! आता लोकलमध्ये बॅग घेऊन दरवाज्यात उभं राहण्यास बंदी

मुंबई : मुंबई लोकल ट्रेनच्या दरवाज्यात बॅग घेऊन उभं राहण्यास रेल्वे प्रशासनाने बंदी घातली आहे. मumbra-दिवा स्थानकादरम्यान बॅग घासल्याने आठ प्रवासी ट्रॅकवर पडून चार जणांचा मृत्यू झाल्याच्या अपघातानंतर हा निर्णय घेण्यात आला. रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे पोलिसांनी गर्दी नियंत्रणासाठी पावलं उचलली असून, संध्याकाळच्या पीक अवर्समध्ये मुख्य स्थानकांच्या प्लॅटफॉर्मवर अतिरिक्त जवान तैनात केले जाणार आहेत.
अपघात कसा झाला?
9 जून 2025 रोजी सकाळी 9:30 वाजता मध्य रेल्वेच्या दिवा-मुंब्रा दरम्यान दोन लोकल ट्रेन (कसारा आणि सीएसएमटीकडे जाणाऱ्या) एकमेकांच्या बाजूने वेगात जात होत्या. प्रचंड गर्दीमुळे फुटबोर्डवर उभ्या प्रवाशांच्या बॅग एकमेकांना घासल्या, ज्यामुळे आठ जण ट्रॅकवर पडले. यात चार प्रवाशांचा मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाले.
रेल्वेचे सुरक्षा उपाय
- नवीन रेल्वे रॅकमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवले जातील, तसेच विद्यमान रॅकमध्येही ही सुविधा जोडली जाईल.
- कल्याण-कसारापर्यंत तिसरी-चौथी, तर कुर्ला-सीएसएमटीपर्यंत पाचवी-सहावी लाइन नियोजित आहे.
- सहाव्या लाइनसह पायाभूत सुविधा सुधारणार.
- सरकारी-खासगी कार्यालयांनी ऑफिस टायमिंग स्टॅगर्ड ठेवावेत.
- दरवाज्यात बॅग घेऊन उभं राहण्यास मनाई, जवान तपासणी करतील.
दरम्यान, मुंबईच्या मध्य रेल्वेवर दररोज 26 लाख प्रवासी प्रवास करतात, त्यापैकी 11 लाख ठाणे-कर्जत/कसारा मार्गावर. प्रचंड गर्दीमुळे फुटबोर्डवर प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते. तज्ज्ञांनी स्टॅगर्ड वर्किंग अवर्स आणि स्वस्त एसी ट्रेनची मागणी केली आहे.




