Delivery in Train : रेल्वे डब्यातच दिला बाळाला जन्म! आरपीएफ जवानांनी कशी केली सुरक्षित प्रसूती? वाचा सविस्तर
Delivery in Train : पुणे-सुपौल एक्स्प्रेसमधील २८ वर्षीय महिलेला प्रवासादरम्यान तीव्र प्रसूती वेदना; आरपीएफ जवानांनी दाखवली माणुसकी आणि तत्परता.

Delivery in Train – रेल्वेच्या आरपीएफ जवानांनी ऑपरेशन मातृशक्ती अंतर्गत धावत्या रेल्वेमध्ये गर्भवती महिलेची सुरक्षित प्रसूतीसाठी मदत करत माणुसकीचे दर्शन घडवले. जवानांच्या तत्परतेमुळे आई आणि बाळ दोघांचे प्राण वाचले असून, त्यांना रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले, बाळ आणि आई दोघे सुखरूप असल्याचे डाॅक्टरांनी सांगितल्यावर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
पुणे-सुपौल एक्स्प्रेसम (गाडी क्र. ११४०१) नेहमीप्रमाणे पुणे रेल्वे स्थानकावरून रात्री नऊ वाजता सुटली. या ट्रेनमध्ये उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेल्या २८ वर्षीय महिला तिच्या पतीसोबत पुणे ते पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन असा प्रवास करीत होत्या. महिलेला तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला याची माहिती दिली.
त्यावेळी अहिल्यानगर पोस्टचे आरपीएफ कर्मचारी, कॉन्स्टेबल सोमनाथ पाठाडे आणि हेड कॉन्स्टेबल विश्वजीत काकडे यांनी कोचकडे धाव घेतली. परिस्थिती अत्यंत संवेदनशील होती. जवानांनी शांतता आणि जबाबदारीने महिलेला धीर दिला. रेल्वे प्रवासादरम्यानच प्रवाशी महिलेने एका बाळाला जन्म दिला. वैद्यकीय मदत आणि पुढील उपचारासाठी आई आणि नवजात बाळाला डब्यातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
स्टेशन प्रशासनाने तातडीने १०८ रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. डॉ. प्रदीप सुरवशे आणि रुग्णवाहिका चालक मयूर बोले यांनी तत्परता दाखवत आई-बाळाला अहिल्यानगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर आई आणि बाळ दोघेही सुरक्षित आणि निरोगी असल्याचे सांगितले. यावेळी आरपीएफ जवानांनी वेळेवर केलेल्या मदतीमुळे कुटुंबियांननी रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे प्रशासनाचे आभार मानले.





