Pune Railway : प्रवाशांसाठी गुड न्यूज! हरंगुळ-पुणे आणि दौंड-कलबुर्गी रेल्वेबाबत मोठा निर्णय; तिकिटाचे दर निम्म्यावर येणार
Pune Railway : खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे हरंगुळ-पुणे आणि दौंड-कलबुर्गी गाड्या नियमित; प्रवाशांना मोठा आर्थिक दिलासा.

Pune Railway – मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या हरंगुळ–पुणे तसेच दौंड–कलबुर्गी या रेल्वे गाड्यांचा ‘विशेष’ दर्जा रेल्वे प्रशासनाने रद्द केला आहे. या दोन्ही गाड्या आता नियमित (कायमस्वरूपी) धावणार असल्याची माहिती माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी दिली. या निर्णयामुळे गाड्यांचे तिकीट दर निम्म्यावर येणार असल्याने प्रवाशांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
जेऊर, कुर्डूवाडी आणि माढा या स्थानकांवरून सोलापूरला जाण्यासाठी सकाळी साडेपाच नंतर थेट दुपारी बारा वाजता गाडी उपलब्ध होती. सकाळी ७ ते ८ या वेळेत गाडी असावी, अशी मागणी प्रवाशांकडून सातत्याने होत होती. त्यासाठी सुरू केलेली दौंड-कलबुर्गी गाडी मध्यंतरी बंद करण्यात आली होती.
खासदार मोहिते-पाटील यांनी सोलापूर येथील ‘डीआरएम’ कार्यालयात बैठक घेऊन ही गाडी पुन्हा सुरू करण्याची आग्रही मागणी केली होती. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहून आता ही गाडी नियमित करण्यात आली असून, गाडी क्रमांकापुढील ‘०’ हा आकडा काढण्यात आला आहे.
पुणे प्रवासासाठी मोठा दिलासा
लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातून पुण्याकडे जाण्यासाठी दुपारच्या वेळेत थेट रेल्वे सेवा उपलब्ध नव्हती. प्रवाशांची गरज ओळखून हरंगुळ-पुणे ही गाडी दुपारी ३ वाजता लातूरहून सोडण्यास सुरुवात झाली होती. या गाडीला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने ती कायमस्वरूपी करण्याची मागणी खासदार मोहिते-पाटील यांनी लोकसभेत लावून धरली होती.
तसेच, ही गाडी हडपसर ऐवजी पुणे स्टेशनपर्यंत नेण्याची विनंतीही त्यांनी केली होती. रेल्वे प्रशासनाने या मागण्या मान्य करत दोन्ही गाड्यांना कायमस्वरूपी स्वरूप दिले आहे. यामुळे प्रवासाचा खर्च कमी होण्यासोबतच प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.





