आता हर्षवर्धन पाटलांची जबाबदारी वाढली! ‘या’ बालेकिल्ल्यात सत्ता आणण्यासाठी शरद पवारांनी टाकला मोठा डाव

Harshvardhan Patil : एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकाकडे पाहिले जात होते. पण २०१७ च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आणि सत्ताबदल होऊन या महापालिकेवर भाजपची सत्ता आली.
त्यानंतरच्या काळात राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली. अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी असा पक्ष विभागला गेला. आता महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने दोन्ही राष्ट्रवादी पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष लक्ष या महापालिकेवर आहे. नुकताच अजित पवार यांनी दोन दिवसांच्या दौरा केला. शरद पवार यांनी देखील पिंपरी चिंचवडमध्ये निवडणुकीसंदर्भात आढावा बैठक घेतली.
अशातच शरद पवार यांनी मोठा डाव टाकला असून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. पिंपरी चिंचवड शहराची जबाबदारी त्यांनी पाटील यांना दिली असून त्यांच्यावर राष्ट्र्वादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी असणार आहे.
पिंपरी चिंचवडचा विचार केला असता येथे तीन विधानसभा क्षेत्र आहेत. यामध्ये पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या विधानसभा क्षेत्रांचा समावेश होतो. आता शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर निवडणुकीच्या अनुषंगाने जबाबदारी सोपवली असली तरी त्यांच्यासमोर मोठी आव्हानही असणार आहेत.
मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार
यांचे कारण म्हणजे अजित गव्हाणे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते गेले आहेत. याशिवाय राहुल कलाटे यांच्या देखील पक्षांतराच्या चर्चा होत आहेत. यामुळे निवडणुकीच्या दृष्टीने मोठ्या आव्हानांचा सामाना हर्षवर्धन पाटील यांना करावा लागणार आहे.
हेही वाचा : 98th Acadamy Awards: नीरज घायवानचा ‘होमबाउंड’ ऑस्कर 2026 मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार





