Sharad Pawar : “फक्त राजशिष्टाचार पूर्ण करण्याकडे लक्ष” – शरद पवार

Sharad Pawar – राज्यात महावृष्टीमुळे थैमान माजले आहे. मराठवाड्यासह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांची घरे उद्ध्वस्त झाले आहे, पिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच, पिकांचे नुकसान झाल्याने काही जणांनी आत्महत्या केल्याचेही समोर आले.
अशामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच त्या त्या राज्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्ह्यामध्ये जाऊन भेटी दिल्या. पण आता यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
सोशल मीडियावर शरद पवार यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये ते म्हणाले की, महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या आपत्तीमध्ये फक्त पिकांचेच नुकसान झाले नाहीतर, जनावरेदेखील मोठ्या प्रमाणात दगावली आहेत.
या अभूतपूर्व संकटाची व्याप्ती खूप मोठी आहे. अतिवृष्टीने फक्त शेतकरीवर्ग बाधित झाला नसून त्याची मोठी झळ गावातील लहान मोठे व्यावसायिक, कारागीर आणि शेतमजुरांना देखील बसली आहे. एकंदरीत गावांमधील बारा बलुतेदार, मागासवर्गीय समुदायावर देखील हे अरिष्ट कोसळले आहे.
राज्यात गावपातळीवर इंधनाचा आणि अन्नाचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला असून सार्वजनिक वितरण व्यवस्था गतिमान करण्याची आवश्यकता आहे. रोगराई पसरण्याची शक्यता असून त्यास आळा घालून आरोग्याच्या सुविधा देखील तातडीने उपलब्ध करणे गरजेचे आहे. विद्यार्थांच्या शिक्षणावर देखील विपरीत परिणाम झाला असून त्याकडे त्वरेने लक्ष द्यावे लागेल, असा सल्लाही त्यांनी दिला.
तसेच, पिडीतांना भेटण्यासाठी मंत्री आणि लोकप्रतिनिधींच्या दौऱ्यांची अतोनात गर्दी होत आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणांचे लक्ष, नुकसानीचे पंचनामे आणि आपत्ती निवारणाच्या कामांऐवजी राजशिष्टाचार पूर्ण करण्याकडे वळले आहे. त्यामुळे पंचनामे करण्यास विलंब होऊन मदतकार्य ठप्प होण्याचा धोका निर्माण झाला आहे, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.





