ठाकरे बंधूंच्या भेटी गाठी वाढल्या; मनसे-शिवसेना युतीच्या चर्चेला वेग, महापालिका निवडणुकीची रणनीती ठरली?

मुंबई : दहीहंडी आणि गणेशोत्सवाचा उत्साह संपल्यानंतर आता पितृपंधरवडा आणि दसऱ्याच्या तयारीत महाराष्ट्र रंगला आहे. याचवेळी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू केली असतानाच, आज (10 सप्टेंबर) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुन्हा एकदा दीर्घ भेट झाली. सुमारे 2 ते 3 तास चाललेल्या या बैठकीने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत आणि अनिल परब, तसेच मनसेचे काही प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या भेटीत आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-मनसे युतीच्या शक्यतेवर प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
संजय राऊत यांनी ही भेट कौटुंबिक असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते, गणेशोत्सवात उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या घरी भेट दिली होती, पण तेव्हा गर्दीमुळे राज ठाकरे यांच्या आई (कुंदा मावशी) यांच्याशी जास्त वेळ बोलणे शक्य झाले नव्हते. त्यानुसार, उद्धव ठाकरे आज कुंदा मावशींना भेटण्यासाठी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले होते. मात्र, बैठकीला दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित असणे आणि ती इतका वेळ चालणे यामुळे राजकीय चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
ठाकरे बंधूंच्या भेटीतील 5 प्रमुख मुद्दे
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील या भेटीत खालील मुद्द्यांवर चर्चा झाली.
- आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि मनसे यांच्यात युतीच्या शक्यतेवर प्राथमिक चर्चा झाली. विशेषत: मुंबई आणि इतर महापालिकांमधील निवडणुकीसाठी रणनीतीवर विचारविनिमय झाला.
- दोन्ही पक्ष युतीसाठी सकारात्मक असून, जागावाटप आणि रणनीती ठरविण्यासाठी लवकरच नेत्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे.
- शिवसेना आणि मनसे यांच्या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झाली, ज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी रणनीती आखण्यावर भर देण्यात आला.
- युतीच्या औपचारिक घोषणेसाठी अद्याप कोणताही मुहूर्त ठरलेला नाही. मात्र, उद्धव आणि राज ठाकरे यांच्यात अशा भेटींच्या फेऱ्या सुरू राहणार आहेत.
- रणनीती ठाकरे बंधूंवर अवलंबून: या बैठकीत संजय राऊत आणि इतर नेत्यांनी सहभाग घेतला असला, तरी युतीच्या पुढील रणनीतीवर अंतिम निर्णय उद्धव आणि राज ठाकरे हेच घेतील.





