लक्षवेधी : तांदळाची निर्यातबंदी योग्य की अयोग्य

देशातील धान्यसाठ्याची स्थिती पाहता भारताने खबरदारी घेत बिगर बासमती तांदळाची निर्यात करण्यावर बंदी घातली. आपण निर्यात करू, एवढा पुरेसा साठा आपल्याजवळ नाही. म्हणूनच सरकारने निर्यात थांबविली आहे.
जागतिक पातळीवर जगभरात तांदळाच्या निर्यातीत भारताचा 40 टक्के वाटा आहे. मात्र, आपल्याकडून निर्यात होणारा तांदूळ हा एकूण उत्पादित तांदळाच्या 12 टक्के एवढा आहे. मात्र, देशातील धान्यसाठ्याची स्थिती पाहता भारताने खबरदारी घेत बिगर बासमती तांदळाची निर्यात करण्यावर बंदी घातली. त्यामुळे साहजिकच जगभरात धान्याच्या किमतीवर परिणाम होईल.
अमेरिकेत तांदळाच्या किमतीत 10 डॉलरने वाढ झाली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारताला भाताची निर्यात का थांबवावी लागली? असा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला आहे. कारण, आपल्याकडे असणारा साठा हा भविष्यात कमी पडण्याची शक्यता आहे. अजूनही खरीप हंगाम सुरू आहे. या हंगामात भात लागवड केली जाते. पण यंदा खराब हवामानाचा फटका बसला. सर्वप्रथम म्हणजे भाताचे प्रमुख उत्पन्न घेणाऱ्या पंजाब, हरियाणात मोठा पूर आला.
आवश्यकतेपेक्षा अधिक पाऊस पडला असून आगामी काळात अनेक भागात धानाचे पीक घ्यावे लागेल, अशी शक्यता आहे. याचाच अर्थ आता होणारी लागवड ही पंधरा ऑगस्टपूर्वी पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यानंतर उशीर झाल्यास पीक अणि उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. भारतात अजूनही अनेक भागात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे तांदळाचे उत्पादन कमी होईल, जे चिंताजनक असेल. धान्यसाठ्याला फटका बसेल. याचा सारासार विचार करता भारताने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.
आपल्याकडे 1 जुलैपर्यंत 7.1 कोटी टन धान आणि गव्हाचा साठा आहे. सध्या हा साठा पुरेसा वाटत आहे. मात्र, आगामी काळात पिकाची स्थिती पाहिली तर सरकारने घेतलेला निर्णय हा योग्य वाटत आहे. योग्य वेळी अचूक निर्णय घेतला आहे. गेल्यावर्षी देशभरात गव्हाचे उत्पादन कमी झाले. तेव्हाही आपण निर्यात करू, अशी अपेक्षा होती. काही अर्थतज्ज्ञांच्या मते, भारत हा जगासाठी अन्नदाता ठरत आहे. एवढेच नाही तर जगातील गव्हाची गरज भारत पूर्ण करेल, असे वाटले होते. मात्र ते चुकीचे गणित होते. आपण निर्यात करू, एवढा पुरेसा साठा आपल्याजवळ नाही. म्हणूनच सरकार वेळीच जागे झाले आणि निर्यात थांबविली.
एकीकडे गरिबांना देण्यासाठी धान्य नाही, तरीही निर्यात वाढवली पाहिजे, असे आपण म्हणतो तेव्हा तो एकप्रकारचा विरोधाभास वाटतो. आपण पंजाबचा विचार केला तर पंजाबचे शेतकरी खूप पाणी वापरतात, असे म्हणतो. विक्रमी भातशेती करणाऱ्या राज्यात 138 ब्लॉक असून त्यापैकी 109 ब्लॉकमध्ये पाण्याने नीचांकी पातळी गाठली आहे. कारण तेथे शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पटीने पाण्याचा उपसा केला जात आहे. आपण जेव्हा निर्यात करतो तेव्हा पंजाबच्या शेतीत वैविध्यपणा आणायला हवे, असेही म्हणतो.
गरजेपेक्षा जादा प्रमाणात तांदळाचे पीक घेतल्याने पाण्याची हानी होते, असे आपण ऐकत आलो आहोत. आजघडीला पंजाब एकूण उत्पादनातील 99 टक्के तांदूळ बाजारात उपलब्ध करून देतो. स्वत: एक टक्काच वापरतो. तांदळाची टंचाई जाणवते तेव्हा सर्वकाही विसरून जा, आम्हाला अधिक तांदूळ हवा, असे आपण पंजाबला म्हणतो. एकीकडे पाण्याची टंचाई आणि दुसरीकडे तांदळाची मागणी, या कात्रीत पंजाब अडकला आहे.
पंजाबचे अर्थतज्ज्ञ एस. एस. जाहाल म्हणतात, की आपण जेव्हा तांदळाची निर्यात करतो, तेव्हा पाण्याची देखील निर्यात करत असतो. राज्यातील 1.2 ते 1.3 कोटी टन तांदळाचे उत्पादन होते तेव्हा त्यासाठी 48 ते 52 अब्ज लीटर पाण्याची गरज लागते. गेल्यावर्षी आम्ही 2.2 कोटी टन तांदळाची निर्यात केली. याचाच अर्थ 2.2 कोटी टन तांदळाबरोबरच 88 अब्ज लीटर पाण्याची निर्यात केली. असे म्हटले जाते की, तिसरे जागतिक महायुद्ध हे पाण्यावरच होईल. तरीही आपण पाण्याची निर्यात करतो आणि पाण्याबाबत चिंताही व्यक्त करतो. यावर गांभीर्याने विचार करतो कोण? तांदळाबरोबरच पाण्याची निर्यात थांबवायला नको का? आज बहुतांश देश पाणी वाचवत आहेत.
जगातील अनेक देश लाकूड निर्यातदेखील करत नाहीत. उलट लाकडाची आयात करतात, जेणेकरून नुकसान होणार नाही. आपण जेव्हा लाकूड परदेशात पाठवतो तेव्हा जंगल आणि पाणी दोन्हीची निर्यात करत असतो. असेच प्रकार कोळसा वापरणारे देशही करतात. भारतातून कोळसा मागवतात. सांगण्याचे तात्पर्य एवढेच की, आज पाणी वाचवले पाहिजे आणि ती काळाची गरज आहे. भारताने वेळीच खबरदारी घेत केवळ तांदळाचीच निर्यात थांबलेली नाही, तर जैवइंधनासाठी देण्यात येणाऱ्या दीड दशलक्ष टन धान्याच्या निर्यातीवरही बंदी घातली आहे. आजची जगाची स्थिती पाहिली तर आपल्याला जेव्हा गरज भासेल, तेव्हा कोणताही देश मदत करेल, असे वाटत नाही.
अमेरिकेकडे एवढे धान्य आहे की ते त्यापैकी नऊ कोटी टन धान्य जैवइंधनासाठी देते. युरोपात 1.2 कोटी टन धान्य इथेनॉलसाठी दिले जाते. हे देश आपल्या सवयी बदलण्यास तयार नाहीत. मात्र भारताला सांगितले की, तुम्ही जगाचे अन्नदाते आहात आणि आपला साठा आणि धान्य जगासाठी मोकळे करा. पण परकियांची ही चाल भारताने वेळीच ओळखली. धान्यांची समस्या सोडवायची असेल तर अमेरिका, युरोपने पुढाकार घेतला पाहिजे. मोटार ही तेलाची वाट पाहू शकते, मात्र मानव अन्नाची वाट पाहू शकत नाही. सध्या 7.1 कोटी टन धान्यसाठा आहे आणि ते गरजेपेक्षा अधिक आहे. आपल्याला कोणतीही भीती बाळगायची गरज नसून अजून तर नवीन पीक यायचे आहे.
नवनाथ वारे





