– अॅड. स्वप्निल जोशी Anti-Superstition Act : महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा (Anti-Superstition Act) अधिनियम 2013 हा अंधश्रद्धेमुळे होणारे शोषण थांबवण्यासाठी 26 ऑगस्ट 2013 रोजी लागू झालेला क्रांतिकारी कायदा आहे. हा कायदा जादूटोणा (Anti-Superstition Act), अघोरी प्रथा, नरबळी प्रतिबंध करून समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी बनवला आहे. व्याख्या : एखाद्या व्यक्तीने, समाजाची घडी विस्कटून टाकण्याच्या दृष्टीने भोंदू लोकांनी सर्वसामान्यत: जादूटोणा (Anti-Superstition Act) म्हणून ओळखल्या जाणार्या तथाकथित अलौकिक शक्तीच्या किंवा भूतपिशाच्च यांच्या नावाने निर्माण झालेल्या सर्व बाबी या कृतीपैकी कोणतीही कृती स्वत: करणे किंवा इतर कोणत्याही व्यक्तीकडून करवून घेणे किंवा त्या कृती करण्यास इतर कोणत्याही व्यक्तीला प्रवृत्त करणे असा आहे. जादूटोणा कायद्याखाली शिक्षा काय आहे? या कायद्याखालील गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र आहे. कायद्यानुसार गुन्हा सिद्ध झाल्यास त्या व्यक्तीला किमान 6 महिने ते जास्तीत जास्त 7 वर्षांचा कारावास आणि किमान 5 ते जास्तीत जास्त 50 हजारांचा दंड होऊ शकतो. खटला चालविण्याचे अधिकार : महानगर दंडाधिकारी किंवा प्रथमवर्ग, न्यायदंडाधिकारी व त्याच्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे न्यायालय. Anti-Superstition Act या कायद्यानुसार काय गुन्हा ठरू शकतो? भूत उतरवण्याच्या बहाण्याने एखाद्या व्यक्तीला दोराने वा साखळीने बांधून मारहाण करणे, काठीने वा चाबकाने मारणे, तिला पादत्राणे भिजवलेले पाणी प्यायला लावणे, मिरचीची धुरी देणे, लैंगिक कृत्य करण्यास जबरदस्ती करणे. एखाद्या व्यक्तीने तथाकथित चमत्कारांचा प्रयोग प्रदर्शित करून त्याद्वारे आर्थिक प्राप्ती करणे. अलौकिक शक्तीची कृपा मिळवण्याच्या हेतूने आणि जीवाला धोका निर्माण होईल, शरीराला जीवघेण्या जखमा होतील अशा अमानुष, अघोरी, अनिष्ट प्रथांचा अवलंब करणे. मौल्यवान वस्तू, गुप्तधन आणि जलस्रोत यांचा शोध घेण्याच्या बहाण्याने वा तत्सम कारणाने करणी, भानामती या नावाने कोणतेही अमानुष, अनिष्ट, अघोरी कृत्य, जादूटोणा करणे. जारणमारण वा अन्य कारणाने नरबळी देणे किंवा देण्याचा प्रयत्न करणे. आपल्या अंगात अतिंद्रिय शक्ती असल्याचं भासवून किंवा एखाद्या व्यक्तीत अशी शक्ती असल्याचा आभास निर्माण करून इतरांच्या मनात भीती निर्माण करणे किंवा तिचे सांगणे न ऐकल्यास वाईट परिणाम होईल असं सांगणे, धमकी देणे, फसवणे, ठकवणे. एखादी व्यक्ती करणी, जादूटोणा करते, भूत लावते वा मंत्रतंत्राने जनावरांचं दूध आटवते असा समज निर्माण करणे किंवा एखादी व्यक्ती अपशकुनी आहे, रोगराईला कारणीभूत आहे असं भासवून तिला त्रास देणे. करणी व चेटूक केल्याच्या नावाखाली एखाद्या व्यक्तीला मारहाण करणे, तिची नग्नावस्थेत धिंड काढणं किंवा तिच्या रोजच्या व्यवहारांवर बंदी घालणं. मंत्राच्या मदतीने भूत-पिशाच्च्यांना आवाहन करणे व करण्याची धमकी देऊन एखाद्याच्या मनात भीती निर्माण करणे. कुत्रा, साप, विंचू चावल्यास एखाद्या व्यक्तीला उपचार घेण्यापासून रोखून किंवा प्रतिबंध करून त्याऐवजी मंत्रतंत्र, गंडेदोरे किंवा यासारखे उपचार करणे.बोटाने शस्त्रक्रिया करून दाखवतो, असा दावा करणे किंवा गर्भवती स्त्रीच्या गर्भाचे लिंग बदलण्याचा दावा करणे. स्वतःत अलौकिक शक्ती असल्याचा दावा करणे किंवा कुणाचा अवतार असल्याचं वा स्वतःचा आत्मा पवित्र असल्याचं भासवणे. मूल न होणार्या स्त्रीला अलौकिक शक्तीद्वारे मूल होण्याचं आश्वासन देऊन तिच्याशी लैंगिक संबंध ठेवणे. कायद्यातून काय वगळण्यात आले आहे? जोशी, नंदीबैलवाले व इतर ज्योतिषांद्वारे दिला जाणारा सल्ला आणि वास्तुशास्त्र, जमिनी खालील पाणी सांगण्याबद्दलचा सल्ला. कोणत्याही धार्मिक वा आध्यात्मिक स्थळी घातलेल्या प्रदक्षिणा, यात्रा, परिक्रमा, याप्रकारचे उपासना मार्ग. वारकरी संप्रदायाच्या वार्या. हरिपाठ, कीतर्न, भजन-प्रवचन व इतर धार्मिक वा पारंपरिक शास्त्रांचे, विद्या-कलांचे शिक्षण, आचरण, प्रचार, प्रसार. दिवंगत संतांचे चमत्कार सांगणे, त्यांचा प्रचार-प्रसार व साहित्य वितरण करणे. शारीरिक व आर्थिक नुकसान न करणार्या प्रकारचे धर्मगुरूंचे चमत्कार सांगणे, त्याचा प्रचार-प्रसार आणि साहित्य वितरण करणे. घर, मंदिर, दर्गा, गुरुद्वारा, पॅगोडा, चर्च किंवा इतर प्रार्थनास्थळ अशा ठिकाणी व्यक्तींकडून किंवा व्यवस्थापनांकडून शारीरिक वा आर्थिक नुकसान न करणारे प्रार्थना, उपासना आणि धार्मिक विधी सर्व धार्मिक उत्सव, सण, विधी, प्रार्थना, मिरवणूक आणि त्या संबंधीची इतर धार्मिक कृत्ये. अंगात येणे, कडकलक्ष्मी, व्रतवैकल्ये, उपवास, नवस बोलणे, मन्नत मागणे, मोहरम मिरवणूक आदि सर्व धार्मिक विधी. राज्यशासन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे घोषित केलेल्या कोणत्याही धार्मिक पारंपरिक कृती.