Nobel Peace Prize: डोनाल्ड ट्रंप यांना नोबेल शांतता पुरस्कार का दिला नाही? निवड समितीच्या अध्यक्षांनी सांगितलं खरं कारण

Nobel Peace Prize 2025 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी गेल्या आठ महिन्यांत “आठ युद्धे” थांबवल्याचा दावा करत नोबेल शांतता पुरस्काराचे हक्कदार असल्याचे वारंवार म्हटले आहे. मात्र, नॉर्वेजियन नोबेल समितीने शुक्रवारी 2025 च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांची निवड केली. मचाडो यांना व्हेनेझुएलातील लोकांच्या लोकशाही हक्कांचा प्रसार आणि हुकूमशाहीविरुद्ध शांततापूर्ण व न्याय्य लढ्यासाठी हा पुरस्कार जाहीर झाला.
या घोषणेनंतर एका पत्रकाराने समितीचे अध्यक्ष यॉर्गेन व्हाट्ने फ्रायडनेस यांना प्रश्न विचारला: “गेल्या काही महिन्यांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी नोबेल शांतता पुरस्काराचे हक्कदार असल्याचे आणि तो मिळवण्याची इच्छा असल्याचे सांगितले आहे. त्यांना हा पुरस्कार न मिळाल्यास हे अमेरिकेचा अपमान ठरेल, असेही ते म्हणाले. नोबेल शांतता पुरस्कार समितीचे अध्यक्ष म्हणून याबाबत आपले काय मत आहे? तसेच, ट्रंप आणि त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या या मोहिमेचा समितीच्या विचारमंथनावर कसा परिणाम झाला?”
यावर फ्रायडनेस म्हणाले, “नोबेल शांतता पुरस्काराच्या दीर्घ इतिहासात समितीने अनेक प्रकारच्या मोहिमा, माध्यमांचे दबाव पाहिले आहेत. आम्हाला दरवर्षी हजारो पत्रे मिळतात, ज्यात लोक शांततेचा त्यांच्यासाठी काय अर्थ आहे हे सांगतात. आम्ही सर्व पुरस्कारविजेत्यांच्या छायाचित्रांनी सजलेल्या खोलीत बसतो, जी धैर्य आणि निष्ठेने भरलेली आहे. आमचे निर्णय फक्त अल्फ्रेड नोबेल यांच्या कार्य आणि त्यांच्या इच्छेनुसार घेतले जातात.”
ट्रंप यांनी आठ महिन्यांत “आठ युद्धे” थांबवल्याचा दावा केला असला, तरी समितीने मचाडो यांची निवड करताना म्हटले, “गेल्या वर्षभरात मचाडो यांना लपूनछपून राहावे लागले. जीवाला धोका असतानाही त्या देशातच राहिल्या, हा निर्णय लाखो लोकांसाठी प्रेरणादायी ठरला. जेव्हा सत्ताधारी हुकूमशाही बळकावतात, तेव्हा स्वातंत्र्याचे रक्षण करणाऱ्या धैर्यशील व्यक्तींना मान्यता देणे गरजेचे आहे.”
गेल्या वर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार जपानच्या अणुबॉम्ब हल्ल्यातून वाचलेल्यांच्या निहोन हिडांक्यो या चळवळीला मिळाला होता. यंदा विजेता निवडण्यापूर्वी समितीने एकूण 338 नामांकनांचा विचार केला, ज्यात 244 व्यक्ती आणि 94 संघटना यांचा समावेश होता.





