Nobel Peace Prize: 2025चा नोबेल शांतता पुरस्कार मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?

Nobel Peace Prize 2025 – व्हेनेझुएलाच्या नेत्या आणि लोकशाहीसाठी लढणाऱ्या मारिया कोरिना मचाडो यांना 2025 चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. नोबेल समितीने त्यांच्या ‘नैतिक धैर्य आणि लोकशाहीच्या लढ्यातील नेतृत्वा’साठी हा पुरस्कार प्रदान केला आहे. मचाडो यांच्या या कार्याने केवळ व्हेनेझुएलातच नव्हे, तर जगभरातील लोकांना प्रेरणा दिली आहे.
कोण आहेत मारिया कोरिना मचाडो?
7 ऑक्टोबर 1967 रोजी व्हेनेझुएलाची राजधानी काराकास येथे जन्मलेल्या मारिया कोरिना मचाडो यांचे वडील हेनरिक मचाडो हे उद्योगपती, तर आई कोरिना पेरिस्का या मानसशास्त्रज्ञ होत्या. लहानपणापासूनच धाडसी आणि नेतृत्वगुणांनी परिपूर्ण असलेल्या मारिया यांनी अँड्रस बेलो कॅथॉलिक विद्यापीठातून औद्योगिक अभियांत्रिकीची पदवी मिळवली आणि नंतर काराकासच्या इन्स्टिट्यूट डी एस्टुडिओस सुपीरियर डी ॲडमिनिस्ट्रेशन (IESA) मधून वित्त विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. चांगली नोकरी किंवा व्यवसायात जाण्याऐवजी त्यांनी व्हेनेझुएलाच्या बिकट परिस्थितीमुळे राजकारणात प्रवेश केला.
लोकशाहीसाठी अथक लढा –
2002 मध्ये मारिया यांनी ‘सुमाते’ (Súmate) नावाची संस्था स्थापन केली, जी निवडणूक प्रक्रियेचे निरीक्षण आणि नागरी हक्कांसाठी कार्य करते. येथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाला खरी सुरुवात झाली. पुढे त्यांनी ‘व्हेंटे व्हेनेझुएला’ नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली आणि देशात बदलाची मागणी करणारा आवाज बनल्या. आपल्या स्पष्टवक्तेपणा आणि स्वच्छ प्रतिमेमुळे त्यांना ‘व्हेनेझुएलाची आयर्न लेडी’ असे संबोधले जाते. त्यांनी माजी राष्ट्राध्यक्ष ह्युगो शावेझ आणि सध्याचे नेते निकोलस मादुरो यांच्या हुकूमशाहीविरोधात उघडपणे आवाज उठवला. अनेकदा धमक्या, अटक यांना सामोरे जावे लागले, तरीही त्या मागे हटल्या नाहीत.
पुरस्काराचे स्वरूप –
नोबेल शांतता पुरस्कारासह मारिया कोरिना मचाडो यांना अल्फ्रेड नोबेल यांचे चित्र असलेले सुवर्णपदक आणि 1.1 कोटी स्वीडिश क्राउन (सुमारे 8 कोटी रुपये) रोख बक्षीस मिळेल. मारिया कोरिना मचाडो आज केवळ नेत्या नसून, व्हेनेझुएलात लोकशाहीच्या पुनर्जननाचे स्वप्न पाहणाऱ्या आशेचा आवाज बनल्या आहेत.
जागतिक प्रेरणा –
मारिया यांच्या या साहसी लढ्याने व्हेनेझुएलाच्या सीमा ओलांडून जगभरातील लोकशाहीप्रेमींना प्रेरणा दिली आहे. त्यांचा हा पुरस्कार व्हेनेझुएलाच्या लोकशाहीसाठीच्या लढ्याला नवी चेतना देणारा ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हा पुरस्कार मिळावा यासाठी ट्रम्प यांनी अनेक प्रयत्न केले पण त्यांना हा पुरस्कार दिला गेला नाही.





