पुणे जिल्हा | होर्डिंग्जवर कारवाईला मुहूर्त सापडेना

थेऊर, {संदीप बोडके} – उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पीएमआरडीएच्या आयुक्तांची अनधिकृत होर्डिंग्जबाबत कानउघडणी केल्यानंतर हिंजवडीतील ३ अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यात आली आहे.
मात्र, पुणे-सोलापूर व पुणे-नगर महामार्गासह जिल्ह्यात हजारो अनधिकृत होर्डिंग्ज धोकादायकरीत्या उभे आहेत. त्यामुळे मोठी दुर्घटना घडल्यावरच, पीएमआरडीए कारवाई करणार का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
मुंबईत घाटकोपरनंतर पुण्यातील मोशी व लोणी काळभोरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याच्या घटना घडल्या होत्या. या पाश्वभूमीवर पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी अनधिकृत होर्डिंग्ज काढून टाका. मालक व फ्लेक्स लावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
यानुसार प्रशासनाने काही ठिकाणे कारवाई करीत दणका दिला आहे. तरीही जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करीत अनधिकृत होर्डिंग्ज व्यवसाय जोमाने सुरु आहे. त्यामुळे प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचारी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची गांभीर्याने अंमलबजावणी करीत नसल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.
पुणे जिल्ह्यातील अनधिकृत होर्डिंग्जच्या जागा मालक व चालकाने एक क्लुप्ती वापरून कारवाई टाळण्यासाठी होर्डिंग्जवरील फ्लेक्स काढले आहेत. मात्र लोखंडाचा सांगाडा तसाच धोकादायकरीत्या लटकलेल्या अवस्थेत ठेवला आहे.
यास प्रशासन पूर्णपणे जबाबदार असून त्यांच्याकडून कारवाईच्या नावाखाली कागदी घोडे नाचविले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून केलेल्या लुटुपुटू कारवाईमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, पाऊस व वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग्ज पडल्याच्या तीन घटना घडल्या आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. दिवसे व पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याच्या सूचना दिल्या होत्या.
या सूचनांचे अंमलबजावणी होत नसल्याने केवळ या सूचना कागदावरच राहिल्या आहेत. चिरीमिरीच्या संबंधापोटी अनधिकृत होर्डिंग्ज मालक व चालकांवर प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होत नाही. अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.
होर्डिंग्जचा लोखंडी सांगाडा निघणार कधी
पुणे-सोलापूर व पुणे नगर महामार्गावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग्ज आहेत. जागा मालकांनी युक्ती करून फ्लेक्स काढला आहे.
मात्र होर्डिंग्जचा लोखंडी साचा तसाच धोकादायकरीत्या लटकलेल्या अवस्थेत ठेवला आहे. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे होर्डिंग्जचा लोखंडी सांगाडा निघणार कधी? असा सवाल नागरिकांनी केला आहे.
कारवाईची बडगा कधी उगारणार
पीएमआरडीए, जिल्हा प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थांनी कारवाईच्या नावाखाली केवळ कागदी घोडे नाचाविल्याचे समोर येत आले. त्यामुळे अनधिकृत होर्डिंग्जचा जागा मालक व चालकाचे फावले आहे.
अनधिकृत होर्डिंग्जवर प्रशासनाच्या वतीने कारवाईची बडगा का उगारला जात नाही, असा सवाल नागरिकांनी केला आहे. होर्डिंग्जचा जागा मालक व चालकांवर कारवाई कधी होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळून 18 जणांचा मृत्यु झाला होता. तर 75 हून अधिक जण जखमी झाले होते. लोणी काळभोर येथीलही दुर्घटनेत तिघेजण जखमी झाले होते.
सुदैवाने मोशी घटनेत केवळ वाहनांचे नुकसान झाले होते. हडपसर, शेवाळेवाडी, मांजरी कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, थेऊर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, उरुळी कांचन, वाघोली, केसनंद, लोणीकंद, पेरणे,
कोरेगाव भीमा परिसरात अनधिकृत होर्डिंग्ज नागरी वस्तीत आहेत. होर्डिंग्जच्या खाली टपऱ्या, दुकाने, हॉटेल, हातगाड्या मोठ्या प्रमाणात आहेत. भविष्यात सांगाडा कोसळून अजून दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण, असा सवाल नागरिकांनी केला आहे.





