Nishikant Dubey : भविष्यात दिपके भीम आर्मीच्या तिकिटावर लढतील; निशिकांत दुबे यांचा दावा
'कॉकरोच जनता पार्टी'चे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दिपके भविष्यात भीम आर्मीच्या तिकिटावर निवडणूक लढवतील, असा दावा भाजपचे खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी मंगळवारी केला.

Nishikant Dubey : ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दिपके भविष्यात भीम आर्मीच्या तिकिटावर निवडणूक लढवतील, असा दावा भाजपचे खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी मंगळवारी केला.
‘नीट’ पेपरफुटीविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनावर भाष्य करताना ते म्हणाले की, इतिहासात प्रत्येक जनआंदोलनातून राजकीय नेते निर्माण झाले आहेत. जेपी आंदोलनातून लालू प्रसाद यादव आणि अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून अरविंद केजरीवाल पुढे असल्याचे दुबे म्हणाले.
दुबे (Nishikant Dubey) यांनी आरोप केला की, सोमवारी झालेल्या ‘संसद चलो’ मोर्चादरम्यान दिपके यांच्यासोबत घोषणाबाजी करणारे बहुतांश लोक हे भीम आर्मी आणि सीएए विरोधी आंदोलनाशी संबंधित होते. तरीही, या आंदोलनातील तरुण आजही आपल्या समस्यांच्या निराकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच विश्वास ठेवतात आणि त्यांनाच आपला नेता मानतात. एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधानांनी तरुणांच्या या मुद्द्यांवर पारदर्शकता आणण्याबाबत चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.
अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानांवर केलेल्या टीकेला उत्तर देण्यास दुबे (Nishikant Dubey) यांनी नकार दिला. पंजाबमधील अमली पदार्थांची भीषण समस्या आणि दिल्लीत लोकपाल लागू न केल्याबद्दल त्यांनी केजरीवाल यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
तसेच, आंदोलक विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईबाबत राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या राजीनाम्याची केलेली मागणी दुबे यांनी फेटाळली. त्याऐवजी काँग्रेसने १९७५ मधील आणीबाणी आणि अण्णा हजारे यांच्या आंदोलनादरम्यान तरुणांवर केलेल्या लाठीचार्जबाबत देशाची माफी मागितली पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला.






