Nira Valley Dams: नीरा खोऱ्यात पाणीसाठ्याची चिंता! गतर्षीच्या तुलनेत ४.९ टीएमसीची घट; वीर धरणात ४५ टक्के उपयुक्त पाणीसाठा
Nira Valley Dams: वीर धरणात अवघा ४५.५० टक्के उपयुक्त साठा शिल्लक; भोर, पुरंदर, बारामती, इंदापूरसह सातारा व सोलापूरच्या पाणी नियोजनावर परिणामाची शक्यता.

– राहुल शिंदे
Nira Valley Dams- नीरा खोऱ्यातील धरणांच्या पाणीसाठ्याबाबत चिंताजनक चित्र समोर आले आहे. पुणे पाटबंधारे विभागाच्या १३ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या अहवालानुसार, नीरा नदीच्या खोऱ्यातील वीर, भाटघर, नीरा देवघर आणि गुंजवणी या चार धरणांमध्ये मिळून सध्या ४३ हजार १९२ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा साठा ४८ हजार ३२९ दशलक्ष घनफूट होता. म्हणजेच, यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत ४ हजार ९१० दशलक्ष घनफूट पाणीसाठा कमी आहे.
एकूण उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी १०० वरून ८९. ८४ टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे नीरा खोऱ्यातील आगामी पाणी नियोजनाचे आव्हान अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या तीन धरणांमध्ये पूर्ण उपयुक्त पाणीसाठा असला, तरी एकूण साठ्यात झालेली घट आणि वीर धरणातील कमी झालेली पाणीपातळी याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आगामी काळात पाऊस झाला नाही, तर शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देणे,
पिण्याच्या पाण्याच्या योजनांचे नियोजन करणे आणि विविध भागांतील पाण्याची गरज भागवणे ही आव्हाने निर्माण होऊ शकतात. पावसाने ओढ दिल्याने रब्बी हंगामातील पिकांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. अशा परिस्थितीत पाण्याचा काटकसरीने वापर, उपलब्ध साठ्याचे नियोजन आणि पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याची गरज आहे. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच संभाव्य पाणीटंचाईच्या दृष्टीने नियोजन करणे आवश्यक आहे.
धरणे भरलेली, पण वीरच्या साठ्याने वाढवली चिंता
नीरा खोऱ्यातील चार धरणांच्या पाणीसाठ्याचा विचार केला, तर भाटघर, नीरा देवघर आणि गुंजवणी धरणांमध्ये प्रत्येकी १०० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र, वीर धरणातील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घटला आहे. अहवालानुसार, वीर धरणात सध्या ४ हजार २७१ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा असून तो क्षमतेच्या ४५.५० टक्के आहे. गेल्या वर्षी याच दिवशी वीर धरणात ९ हजार ४०८ दशलक्ष घनफूट म्हणजेच १०० टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. त्यामुळे वीर धरणातील पाणीसाठ्यातील घट विशेष लक्षवेधी ठरत आहे.
पुणे, सातारा आणि सोलापूरच्या पाणी नियोजनावर परिणाम
नीरा खोऱ्यातील या चारही धरणांतील पाण्यावर पुणे जिल्ह्यातील भोर, पुरंदर, बारामती आणि इंदापूर तालुक्यांतील शेती तसेच पिण्याच्या पाण्याच्या योजना अवलंबून आहेत. याशिवाय सातारा जिल्ह्यातील खंडाळा आणि फलटण, तर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठीही या पाणीसाठ्याला महत्त्व आहे. त्यामुळे धरणांमधील पाण्याची उपलब्धता आणि त्याचे योग्य नियोजन या भागातील शेतकरी, नागरिक आणि प्रशासनासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.





