Nira ATM Fraud: नीरेत एटीएम सुरक्षेचा बोजवारा! आठवड्याभरात ७० हजार लंपास; सुरक्षा यंत्रणा मात्र सुस्त
Nira ATM Fraud: पुरंदर तालुक्यात एटीएम फसवणुकीचे सत्र सुरुच; पिंगोरीतील शेतकऱ्यापाठोपाठ आता राख येथील मेंढपाळ भामट्यांच्या जाळ्यात.

Nira ATM Fraud – पुरंदर तालुक्यातील नीरा शहरात एटीएम फसवणुकीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आठवडाभरात एटीएम फसवणुकीची दुसरी घटना समोर आली असून, गुरुवारी राख येथील मेंढपाळ व्यावसायिक अण्णा महानवर यांची ४० हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. एटीएममध्ये मदतीच्या बहाण्याने अनोळखी व्यक्तीने महानवर यांचा विश्वास संपादन केला.
काही वेळातच त्यांच्या खात्यातून पैसे काढून पोबारा केला. याच आठवड्यात पिंगोरी येथील एका शेतकऱ्याचे एसबीआयच्या एटीएममध्ये कार्ड बदलून ३० हजार रुपये लंपास केले होते. त्या घटनेनंतर काही दिवसांतच पुन्हा अशाच पद्धतीची घटना घडल्याने नीरा शहरातील एटीएम केंद्रांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अण्णा महानवर पैसे काढण्यासाठी महाराष्ट्र बँकेच्या एटीएममध्ये गेले होते.
त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने “मी मदत करतो” असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. व्यवहारादरम्यान त्याने हातचलाखी करून महानवर यांच्या खात्यातून ४० हजार रुपये काढले. व्यवहार झाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महानवर यांनी तातडीने शेजारील बँकेत धाव घेतली. मात्र, अपेक्षित तत्परता दाखवली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
बँकेनंतर पोलीस ठाण्यातही हेलपाटे
फसवणुकीची माहिती मिळताच महानवर यांनी नीरा पोलिसांत धाव घेतली. मात्र, तक्रार नोंदवण्यासाठी त्यांना विविध ठिकाणी पाठवल्याने त्यांची मोठी फरफट झाल्याचे त्यांनी सांगितले. शुक्रवारी त्यांनी लेखी अर्ज देऊन तक्रार नोंदवली. फसवणुकीनंतर नागरिकाला बँक आणि पोलीस यंत्रणेकडून बेजबाबदार वागणूक मिळत असल्याने संताप व्यक्त होत आहे.





