Koregaon Police: कोरेगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई! ‘त्या’ एका फोन कॉलमुळे उधळला एटीएम चोरीचा डाव
Koregaon Police: कोरेगावातील SBI बँक ATM चोरीचा प्रयत्न उधळला; मुंबईतील CMS कंपनीच्या सतर्कतेमुळे आरोपी अवघ्या १० मिनिटांत गजाआड.

Koregaon Police – कोरेगाव शहरातील मेन रोडवर असलेल्या वैभव पार्क इमारतीतील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतील एटीएम मशीन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न कोरेगाव पोलिसांनी अवघ्या दहा मिनिटांत उधळून लावत आरोपीला रंगेहाथ अटक केली. या तत्परतेबद्दल कोरेगाव पोलिसांचे विशेष अभिनंदन होत आहे. याबाबत पोलिसांकडुत मिळालेली माहिती अशी,
मंगळवारी मध्यरात्री सुमारे पावणेएकच्या सुमारास भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या आवारातील एटीएम मशीन एका चोरट्याने फोडण्यास सुरुवात केली होती. त्याबाबतचा संदेश प्राप्त होताच एटीएम मशीन व्यवस्थापन पाहणार्या मुंबई येथील सीएमएस कंपनीच्या असिस्टंट मॅनेजर यांनी सातारा जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली.
ही माहिती मिळताच पोलीस नियंत्रण कक्षाने कोरेगावचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना घटनेची माहिती दिली. सीएमएस कंपनीकडून मिळालेले लोकेशन आणि घटनास्थळाचे फोटोही त्यांच्याकडे पाठविण्यात आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक देवकर यांनी तत्काळ गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार समाधान शेडगे यांना घटनास्थळी रवाना होण्याचे आदेश दिले.
शेडगे यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यातील हवालदार नागराज कदम, सतीश कर्णे, भाऊसाहेब जाधव यांच्यासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रात्र गस्तीवरील दोन पोलीस जीप तसेच गस्ती पथकालाही मदतीसाठी पाचारण करण्यात आले. चालक शिवाजी माने हे पोलीस पथकासह अवघ्या दहा मिनिटांत घटनास्थळी पोहोचले.
यावेळी एटीएम मशीन फोडून चोरीचा प्रयत्न करणार्या गणेश बाळकृष्ण सुतार, (रा. कुमठे ता. कोरेगाव) याला रंगेहाथ पकडण्यात पोलिसांना यश आले. या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे संभाव्य आर्थिक चोरी टळली. उत्कृष्ट आणि वेळेवर केलेल्या या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांनी कोरेगाव पोलिसांचे विशेष अभिनंदन केले आहे.





