Nigdi Bus Stand: श्रीमंत महापालिकेचे ‘दरिद्री’ बसस्थानक! ज्येष्ठ नागरिक अन् दिव्यांगांचे हाल; प्रशासनाला कधी येणार जाग?
Nigdi Bus Stand: पावसाळ्यात चिखल-पाणी तर उन्हात डोक्यावर छताचा अभाव; 'श्रीमंत' महापालिकेच्या अनास्थेविरोधात निगडीत प्रवाशांचा आक्रोश.

Nigdi Bus Stand – सुमारे दहा हजार कोटींचे अर्थसंकल्प असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील महत्त्वाचे वाहतूक केंद्र असलेल्या निगडी बसस्थानकाची अवस्था दयनीय झाली आहे. प्रवाशांसाठी पुरेसे शेड नाही, परिसरात खड्डे आहेत, बसच्या वेळेचे नियोजन विस्कळीत आहे. गर्दीच्या तुलनेत बसेसची संख्याही अपुरी असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. त्यामुळे ‘श्रीमंत महापालिकेचे दरिद्री बसस्थानक’ अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशी व्यक्त करीत आहेत.
मेट्रोच्या कामामुळे पूर्वीचे शेड हटविण्यात आले. मात्र, पर्यायी व्यवस्था पुरेशी नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. पावसात चिखल आणि पाणी साचल्याने कपडे खराब होतात. उन्हातही प्रवाशांना उभे राहावे लागते. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांची विशेष गैरसोय होत आहे. बसस्थानक परिसरातील खड्ड्यांमुळेही प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. चोरीच्या घटनांबाबतही प्रवाशांनी तक्रारी केल्या आहेत.
प्रवासी नितीन उमेकर यांनी शेडबाबत अनेकदा वरिष्ठांकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचे सांगितले. सौजन्या पाटील यांनी बस वेळेवर येत नसल्याची तक्रार केली. समृद्धी भोईटे यांनी बसेस अपुऱ्या असल्याचे म्हटले. तृप्ती घुमते यांनी पीएमपीएमएल ॲप आणि प्रत्यक्ष बसच्या वेळेत विसंगती असल्याचे सांगितले. रामदास गायकवाड यांनी दिव्यांग प्रवाशांसाठी स्वतंत्र सुविधा आवश्यक असल्याचे नमूद केले.
दरम्यान, असिस्टंट ट्रॅफिक इन्स्पेक्टर राजेंद्र भालके यांनी मेट्रोच्या कामामुळे शेड काढण्यात आल्याचे सांगितले. स्थानिक बस वेळेवर धावतात, तर बाहेरील गाड्यांना वेळापत्रक नसते, असे त्यांनी स्पष्ट केले. बसमध्ये चोरी होण्याच्या तक्रारी असून सुरक्षेसाठी रक्षक नेमल्याचेही त्यांनी सांगितले.





