Pune District : न्हावरा-चौफुला मार्ग तीन तास ठप्प
Pune District : आवश्यक ठिकाणी ब्लिंकर लाईट, रंबल स्ट्रिप, दिशादर्शक फलक, चौकांमध्ये स्ट्रीट लाईट, केडगाव येथील उड्डाणपुलावर प्रकाशव्यवस्था, गटारलाइनची अर्धवट कामे पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

पारगाव : न्हावरा-चौफुला राष्ट्रीय महामार्गावरील विविध अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करून प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, या मागणीसाठी पारगाव चौकात ग्रामस्थांच्या वतीने अर्धा तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सुमारे तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
न्हावरा-चौफुला राष्ट्रीय महामार्गावर आतापर्यंत अनेक अपघात झाले असून त्यामध्ये अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. महामार्गाचे काम पूर्ण झाले असले तरी विविध ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने त्रुटी व अपूर्ण कामे असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. आवश्यक ठिकाणी ब्लिंकर लाईट, रंबल स्ट्रिप, दिशादर्शक फलक, चौकांमध्ये स्ट्रीट लाईट, केडगाव येथील उड्डाणपुलावर प्रकाशव्यवस्था, गटारलाइनची अर्धवट कामे पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी सयाजीत ताकवणे, सरपंच सुभाष बोत्रे, संभाजी ताकवणे, रमेश बोत्रे, पोपटराव ताकवणे यांनी आंदोलनाला संबोधित केले. संभाजी ताकवणे यांनी, यापुढे या महामार्गावर नागरिकांचा नाहक बळी गेल्यास राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची भूमिका ग्रामस्थ घेतील, असा इशारा दिला.
यावेळी सरपंच सुभाष बोत्रे व सयाजीत ताकवणे यांनी अपूर्ण कामे तातडीने पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
आंदोलनामुळे आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील; मात्र नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची आहे,” अशी भूमिका त्यांनी मांडली. रमेश बोत्रे म्हणाले, पूर्वी स्वातंत्र्यासाठी आंदोलने करावी लागत होती; आता स्वसंरक्षणासाठी आंदोलने करण्याची वेळ आली आहे. पोपटराव ताकवणे यांनी हा महामार्ग म्हणजे “मृत्यूचा सापळा” बनला असून रस्त्याच्या गुणवत्तेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे सांगितले.
दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. राष्ट्रीय महामार्ग पुणे विभागाचे शाखा अभियंता किरण गोडसे यांनी ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारले. यावेळी त्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आवश्यक ती कामे करण्यात येतील, असे आश्वासन दिले. आंदोलनानंतर महामार्ग पोलिसांनी काही वेळातच वाहतूक सुरळीत केली. आंदोलनाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
आठवडाभरात सुविधा देणार- गोडसे
राष्ट्रीय महामार्ग शाखा अभियंता गोडसे म्हणाले, दुपदरी रस्त्यावर दुभाजक टाकता येत नाहीत. काही परिस्थितीत हे दुभाजकच अपघाताला कारणीभूत ठरू शकतात. स्ट्रीट लाईटचा प्रस्ताव रस्ता सुरक्षा समितीकडे पाठविला आहे. पारगाव चौकातील हायमास्ट दिव्याचे काम प्रगतिपथावर असून पुढील आठवड्यात आवश्यक ठिकाणी रंबल स्ट्रिप व ब्लिंकर लाईट बसविण्यात येतील, असे गोडसे यांनी सांगितले.





