“वाल्मिक कराडला जेलमध्ये सोयी सुविधा”

Walmik Karad : संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. धनंजय देशमुख यांनी थेट पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिले असून या पत्रात तक्रारींचा पाढा वाचला. धनंजय देशमुख यांना पोलीस ठाण्यात अरेरावी करण्यात आल्याचा आरोप केला आहे. बाहेरील लोक वाल्मिक कराड असलेल्या पोलीस कोठडीपर्यंत जातात, वाल्मिक कराडला मिळत असलेल्या सुविधा व यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचा आरोपही धनंजय देशमुखांनी केला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याची चौकशी करण्याची मागणी देखील धनंजय देशमुख यांनी केली.
धनंजय देशमुखांनी तक्रारीत काय काय म्हटले आहे?
वरील विषयान्वये तक्रार करणार मी नामे धनंजय पंडितराव देशमुख असून माझे राख्खे बंधू संतोष पंडितराव देशमुख यांची हत्या ९ डिसेंबर 2024 रोजी अपहरण करून करण्यात आले. या हत्ये संदर्भात आज २४ दिवस उलटले असून या कामी पोलीस स्टेशन शहर बीड येथे गेलो असता, खंडणी प्रकरणी आरोपी असलेले वाल्मिक कराड यांना भेटण्यासाठी कोरेगाव माजी सरपंच पती बालाजी तांदळे हे आले आणि थेट पोलीस ठाण्यात गेले. मला विचारले तू इथे काय करायला, सीआयडीवाले कुठे आहेत आणि वाल्मिक कराड यांना ठेवण्यात आलेल्या कोठडी कडे गेले. दोन मिनिटात परत आल्यावर मी म्हटले तुम्ही त्या सहा तारखेच्या दिवशी पवनचक्की वादाच्या ठिकाणी होतात. आम्हाला म्हटला आरोपी मीच पकडले आणि माझ्या भावाची हत्या करणाऱ्या सुदर्शन घुले यांचा फोटो दाखवला व आरे रावी केले आणि संताप जनक माझ्याशी वागला.
आम्ही सदरील घटना पोलीस महिला कर्मचारी रेडेकर यांना सांगितली तर त्याने हुजत घातली व आपण सीआयडी सोबत आलो आहोत असे सांगितले. येथील दंगल पथकातील कर्मचारी यांना आपण सीआयडी चा वाहन चालक असल्याचे म्हटला रेडेकर यांच्याशी हुजत घालणारे बालाजी तांदळे यांच्यावर कार्यवाही करण्याचा विषय काढताच त्या ठिकाणी असलेले एपीआय दराडे यांनी आवाज कमी करून बोला असे उलट रेडेकर यांनाच बोलले व तांदळे यांना बाजूच्या रूम मध्ये बसवून नंतर सोडून दिले. मेहरबान साहेब माझी आपल्याकडे तक्रार आहे कि ज्या ठिकाणी आरोपी आहेत अश्या ठिकाणी असे लोक येतात कसे, खुन करणारे मुख्य आरोपी अद्याप सापडले नाहीत आणि मला त्या घुले नामक आरोपीचा फोटो दाखवणे म्हणजे मला दहशती खाली घेत होता अशी माझी तक्रार आहे.
अश्या लोकांच्या थेट कोठडी पर्यंत येण्याने माझ्या भावाच्या हत्येचा निकाल कधी लागणार तपास कामाला प्रभावित करण्याचा हा प्रकार तर नसावा अशी शंका या ठिकाणी मला आलेली आहे. या संदर्भाने आपण बालाजी तांदळे यांची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी मी करत आहे. यावेळी एपीआय दराडे यांनी तांदळे यांना पाठीशी का घातले, दराडे आणि तांदळे यांचे संगनमत असून यातून तपास प्रभावित होत असेल तर ? माझ्या भावाची हत्या झालेली आहे यात कुणी हलगर्जी केली तर आरोपींना शासन होणार नाही. यासाठी बालाजी तांदळे व एपीआय दराडे यांची चौकशी अपेक्षित असून यांना वाल्मिक कराड यांच्या पासून दूर ठेवावे अशी मी मागणी करत आहे. वरील घटना घडली तेव्हा माझ्या समवेत माझे साडू दादासाहेब बाबुराव खिंडकर तथा माझे सुरक्षा रक्षक पोलीस कर्मचारी नितीन जाधव हे होते.
वाल्मिक कराडवर अनेक आरोप –
मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विरोधकांकडून वाल्मिक कराडवर अनेक आरोप केले जात आहे. सध्या वाल्मिक कराड 15 दिवसांच्या बीडच्या सीआयडी कोठडीत आहे. त्याची चौकशी सुरू आहे. दरम्यान बीड पोलीस ठाण्याच्या बाहेर एका खांबाला लावलेले पाच पलंग चर्चेत आले आहे. हे पलंग वाल्मिक कराडसाठी आणल्याचा आरोप विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून केला जात आहे.
काँग्रेस नेत्यांसह शरद पवार गटाच्या नेत्यांकडूनही हा सवाल उपस्थित केला जात आहे. वाल्मिक कराड बीड पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर या पाच पलंग का मागविण्यात आले, असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. पोलीस स्टेशनमध्ये नवीन पाच पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत, स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी आजच अचानक पलंग कसे मागवले? असा सवाल शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये पुढे लिहिलं आहे की, नवीन पलंग कर्मचाऱ्यांसाठी मागवले असतील तर एवढीच तत्परता राज्यभरातील सर्वच पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांसाठी दाखवायला हवी शिवाय गादी-उशी, पंखा, AC देखील बसवता येतील का, याचाही विचार करायला हवा.
विजय वडेट्टीवारांची पोस्ट –
महायुती सरकारच्या लाडके आरोपी योजनेत वाल्मिक कराड येत असल्याने बीड पोलीस स्थानकात नवीन पाच पलंग आले का? वाल्मिक कराड पोलीस कोठडीमध्ये असताना पाच पलंगांची आवश्यकता भासावी, इतके योगायोग चित्रपटात ही नसतात. आरोपीचे लाड पुरवण्याची ही सुरुवात आहे. हळूहळू टिव्ही, एसी, पंचतारांकित हॉटेलमधील जेवण सगळच मिळेल! वाल्मिक कराडवर या सरकारला निष्पक्ष कारवाई करायची आहे का? करायची असेल तर बीड जिल्ह्याच्या बाहेर चौकशी आणि तपास केला पाहिजे. ज्याने पोलिसांना आतापर्यंत आपल्या धाकात ठेवले ते त्याची चौकशी करणार की सेवा? सरकारने कराडवर कारवाई करण्याचे नाटक एकतर बंद करावे आणि कारवाई करायची असेल तर ती गांभीर्यपूर्वक करावी. कराडवर अजून ही संतोष देशमुख हत्या असो की मकोका अंतर्गत गुन्हा ही दाखल झालेली नाही, त्यामुळे या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.





