Dnyaneshwari Munde : बीड जिल्ह्यातील परळी येथे व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच आणखी एक गंभीर घडामोड समोर आली आहे. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेबाबत भीती व्यक्त करत बीड पोलीस अधीक्षकांकडे संरक्षणाची मागणी केली आहे. वाल्मिक कराडच्या मुलांवर आरोप महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. सध्या तो अन्य प्रकरणात तुरुंगात आहे. मात्र त्याची दोन मुलं सुशील कराड आणि गणेश कराड यांच्याकडून आपल्या कुटुंबाला धोका असल्याचा आरोप ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला आहे. तक्रार अर्जात त्यांनी नमूद केले आहे की, दत्तात्रय मुंडे, अशोक मुंडे, प्रणव मुंडे, पंकज मुंडे, प्रवीण मुंडे, सतीश फड आणि भगवान फड यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. कुटुंबातील सदस्यांबाबत काही अनपेक्षित घटना घडल्यास संबंधितांना जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. मुलांवर मारहाणीचा प्रयत्न ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या म्हणण्यानुसार, १९ फेब्रुवारी रोजी त्यांचे मुलगे प्रवीण आणि प्रणव मुंडे घरी परतत असताना एका तरुणाने त्यांना शिवीगाळ आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केला. संबंधित तरुणाच्या सोशल मीडियावर वाल्मिक कराड यांचे स्टेटस आढळल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे आपल्या मुलांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता असल्याचे त्यांनी सांगितले. अन्य आरोपींपासूनही धोका? या प्रकरणातील अन्य आरोपी ‘गोट्या गित्ते’ अद्याप बाहेर असल्याने त्याच्याकडूनही धोका असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली असून त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिणार असल्याचे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितले.