वाल्मीक कराड आणि पोलिस अधिकाऱ्याच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल; सुरेश धस काय म्हणाले?

Walmik Karad Audio Clip Viral: संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात आधीच अडचणीत आलेल्या वाल्मीक कराडचा पाय आता आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. वाल्मीक कराड आणि पोलिस अधिकाऱ्याच्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओमध्ये वाल्मीक कराड हा ‘किरकोळ गुन्हा आहे. आपला पोरगा आहे. जाऊद्या द्या सोडून..’ तसेच ‘मी बीड जिल्ह्याचा बाप आहे. मी असल्यावर चिंता काय’ असे पोलिस अधिकाऱ्याला सांगत असल्याचे ऐकू येते. या ऑडिओ क्लिपमुळे वाल्मीक कराडच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
वाल्मीक कराड आणि पोलिस उपनिरीक्षक निशिगंधा खुळे यांच्यात होत असलेल्या संभाषणाची एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये वाल्मीक कराड एका मुलाला वाचविण्याचा आदेश तत्कालीन सायबर सेलच्या पोलिस उपनिरीक्षकांना देत आहे. नाशिक येथील एका कार्यकर्त्याला बीड पोलिसांनी फोन केला होता. त्यामुळे त्याने वाल्मीक कराडकडे मदत मागितली. यानंतर वाल्मीकने थेट महिला पोलिसाला फोन करुन कार्यकर्त्याला त्रास न देता प्रकरण सोडून देण्याचा सल्ला दिला. मात्र, या ऑडिओ क्लिपची पुष्टी केली जात नाही.
सुरेश धस काय म्हणाले?
आमदार सुरेश धस यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बीडमधील सद्यस्थिती व संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासावर चर्चा केली. यावेळी, बीडमधील अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या वाल्मिक कराडशी थेट संबंध असून त्यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याची मागणी देखील धस यांनी केली आहे. दरम्यान, वाल्मिक कराडची आणखी एका ऑडिओ क्लीप आज व्हायरल झाली असून सायबर विभागाच्या महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत वाल्मिक कराडचा हा संवाद झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यावरूनही सुरेश धस यांनी माहिती देत पुढील 15 दिवस ही क्लिप वाजणार असल्याचे त्यांनी म्हटले.
धस म्हणाले, वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकाऱ्याच्या ह्या व्हायरल क्लिपसंदर्भात माझे मत आहे की, पुढील 10-15 दिवस हे चालणार आहे. या दोन महिला अधिकारी आहेत, त्यांना आकाने फोन केलाय. किरकोळ केस सांगितली जात आहे, पण माध्यमांनी यासंदर्भात तपास करावा. मी यासंदर्भात अधिक उत्तर देणार नाही, मंत्रालयाची मीडिया म्हणजे राज्याची मीडिया आहे, तुम्ही तपास करा, असे धस यांनी माध्यमांना उद्देशून म्हटले. तसेच, त्या अधिकाऱ्याने स्पीकर ऑन कसा केला, सोडू दे असं कसं ते म्हणाले यासंदर्भात तपास करावा. पुढील 15 दिवस हे प्रकरण चालणार आहे, ही क्लिप डीलिट करु नका, असेही सुरेश धस यांनी म्हटले. त्यामुळे, या व्हायरल क्लिपसंदर्भात आणखी गूढ वाढले आहे.
काय आहे व्हायरल क्लिपमध्ये ?
आरोपी वाल्मिक कराड आणि बीड पोलीस दलातील एका महिला पोलीस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. बीडमधील सायबर सेलच्या निशिगंधा खुळे आणि वाल्मिक कराड यांच्यातील हे संभाषण असल्याचे सांगण्यात येते. निशिगंधा खुळे यापूर्वी सायबर सेलमध्ये होत्या. आता त्यांची बदली गेवराईला झाली आहे. या संभाषणात किरकोळ गुन्हा आहे, द्या सोडून.. असं वाल्मिक कराड म्हणताना ऐकू येतंय. तसेच, संबंधित कार्यकर्त्याशी बोलताना इथं बाप बसलेले आहेत आपण.. असा उल्लेख या ऑडिओ क्लिपमध्ये झाला आहे. मात्र, या ऑडिओ क्लिपची पृष्टी केली जात नाही. दरम्यान, या व्हायरल क्लीपमुळे आता वाल्मिक कराड पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे.
याआधीची एक ऑडिओ क्लिप झाली व्हायरल –
दरम्यान, काही दिवसांपूर्वी वाल्मीक कराडची पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्यासोबतची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. सनी आठवले नावाच्या कार्यकर्त्याला वाचवण्यासाठी वाल्मिकने फोन केला होता. पोलिसांनी ऑडिओ क्लिप संदर्भातील आरोप फेटाळले आहेत. शितलकुमार बल्लाळ यांनी समोर येऊन आपली भूमिका मांडली. ऑडिओ क्लिपमधील आवाज माझा नसून कुणीतरी एआयच्या माध्यमातून हे बनवले असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर आता मंगळवारी एक नवीन ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये तो आपण बीडचा बाप असल्याचे म्हणत आहे.





