Pune : आसपासच्या प्रभागांतही चाचपणी

फुरसुंगी (महादेव जाधव) –पुणे महापालिकेमध्ये समावेश झालेली 34 गावे शहरातील जुन्या प्रभागांनालाच जोडण्यात आली आहेत. विद्यमान विरूद्ध समाविष्ट गावांतील दिग्गज इच्छुक, अशीच थेट निवडणूक होणार असल्याने आपापल्या गावांत स्थानिक लोकप्रतिनिधीच हवा, असा सूर आळवणाऱ्यांची मोठी कोंडी होणार आहे. नव्यांना संधी दिली गेली तर विद्यमानांचा पत्ता कट होणार असल्याने अनेकांनी आसपासच्या प्रभागांतही चाचपणी करण्यात सुरूवात केली आहे.
फुरसुंगी, उरुळी देवाची, औताडे-हांडेवाडी, होळकरवाडी, वडाचीवाडी, उंड्री, पिसोळी या गावांचा समावेश पालिकेत झाला आहे. फुरसुंगीचे तिन प्रभागात विभाजन झाल्याने अनेक दिग्गजांना धक्काच बसला आहे. प्रभाग क्र.45, प्रभाग क्र.46, प्रभाग क्र.22, प्रभाग क्र.46, प्रभाग क्र.47 मध्ये या परिसरातील गावांचा समावेश करण्यात आला आहे. भौगोलिकदृष्ट्या हे प्रभाग पाहता उमेदवारांची दमछाक होणार आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेचे या गावांमध्ये चांगले प्राबल्य असले तरी भारतीय जनता पक्ष व कॉंग्रेसनेही जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तर, मनसेही आपली ताकद आजमावू शकते. त्यातच महाविकाआघाडी झाल्यास अनेक “इच्छुकां’ची तिकिटे कापली जाणार असल्याने अनेक जण “गॅस’वर आहेत. यातूनच मोठ्या प्रमाणात होणारी बंडखोरी रोखण्याचे आव्हान आघाडीतील पक्षांसमोर असेल.
आराखडे ठरणार चुकीचे…
राजकीय पक्षाचे तिकीट मिळाले तरी कोणत्याही उमेदवाराने मतदारांना गृहीत धरू नये. या प्रभागांतील मतदार जागरुक व सुज्ञ आहे. आपल्या भागातील उमेदवारालाच मतदान होऊ शकते, आपल्या गावातील उमेदवार नसेल तर त्या गावांतून मतदानाची टक्केवारी कमी होऊ शकते, असे आराखडेही चुकीचे ठरू शकतात. यामुळेच केवळ “वजनदार’ उमेदवारालाच प्रत्येक पक्षाचे तिकीट जावू शकते. या सर्वच प्रभागांत साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर करून निवडून येण्यासाठी अनेकजण प्रयत्नशील आहेत.
“प्रथम नगरसेवक’ होण्यासाठी…
या प्रभागांमध्ये फुरसुंगी, उरुळी देवाची, औताडे-हांडेवाडी, होळकरवाडी, वडाचीवाडी, उंड्री, पिसोळी ही गावे शेजारी-शेजारी असल्याने व सर्वच पक्षातील नेते, कार्यकर्ते व नागरीक एकमेकांना परिचीत असून नातीगोती जवळची आहेत. त्यामुळे या गावांमधुन “प्रथम नगरसेवक’ होण्यासाठी मतभेद विसरून अनेकजण कामाला लागले आहेत. परंतु, तुल्यबळ, जनमत असणारा व विकासाचे दृष्टी असणारा व सर्वात महत्वाचे म्हणजे धनदांडगा असणे गरजेचे आहे, अशी चर्चा नागरीकांमध्ये आहे.



