IND vs NZ 3rd Test (Day 2 Highlights) : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना वानखेडे, मुंबई येथे खेळवला जात आहे. मुंबई कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या दिवसअखेर दुस-या डावात न्यूझीलंडची धावसंख्या 9 बाद 171 धावा अशी झालेली आहे. अशाप्रकारे किवी संघाची आघाडी 143 धावांपर्यंत वाढली आहे.खेळ थांबला तेव्हा न्यूझीलंडकडून एजाज पटेल आणि विल्यम ओरुक नाबाद माघारी परतले आहे.
शनिवारी दुस-या डावात किवीजकडून विल यंगने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 51 धावांची शानदार खेळी केली. त्यांच्याशिवाय कॉनवेने 22, मिशेलने 21 आणि फिलिप्सने 26 धावा केल्या. भारताकडून जडेजाने चार आणि अश्विनने तीन विकेट घेतल्या. तर आकाश दीप आणि सुंदर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
तत्पूर्वी,न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात 235 धावा केल्या होत्या.त्यानंतर शनिवारी भारताचा पहिला डाव 263 धावांवर संपला. या अर्थाने टीम इंडियाला 28 धावांची आघाडी मिळाली होती.
शनिवारी भारताने चार बाद 86 धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली आणि उर्वरित सहा विकेट्स गमावताना आणखी 177 धावा जोडल्या.शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांनी आज भारतीय डाव पुढे नेला आणि आक्रमक फलंदाजी केली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी केली. या काळात पंतने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 13वे अर्धशतक तर गिलने सातवे अर्धशतक झळकावले.
मोठा फटका मारण्याच्या नादात पंत LBW आऊट झाला. ईश सोधीने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पंत 59 चेंडूंत आठ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 60 धावा करून बाद झाला. यानंतर भारताचा डाव गडगडला. एकवेळ भारताची धावसंख्या चार विकेटवर 180 धावा होती आणि त्यानंतर 83 धावा करताना टीम इंडियाने शेवटच्या सहा विकेट गमावल्या.
पंत बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजा 14 धावा करून बाद झाला आणि रविचंद्रन अश्विन सहा धावा करून बाद झाला. शुभमन गिलने 146 चेंडूंत सात चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने 90 धावांची खेळी केली. सर्फराज खान आणि आकाश दीप यांना खातेही उघडता आले नाही.
वॉशिंग्टन सुंदरने शेवटी काही मोठे फटके मारले आणि भारताला आघाडी मिळवून दिली. सुंदर 36 चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 38 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. न्यूझीलंडकडून एजाज पटेलने पाच विकेट घेतल्या. तर मॅट हेन्री, ग्लेन फिलिप्स आणि ईश सोधीने प्रत्येकी एक विकेट घेतली.