IND vs NZ 3rd Test Live Score: भारत आणि न्यूझीलंडमधील मालिकेचा तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे.मुंबई कसोटीत टीम इंडियाचा पहिला डाव 263 धावांंवर संपुष्टात आला आहे. पहिल्या डावात किवी संघ केवळ 235 धावांंवर आटोपला होता. अशा परिस्थितीत टीम इंडियाने पहिल्या डावांनतर 28 धावांंची आघाडी घेतली आहे.
शनिवारी भारताने चार बाद 86 धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली आणि उर्वरित सहा विकेट्स गमावताना आणखी 177 धावा जोडल्या.शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांनी आज भारतीय डाव पुढे नेला आणि आक्रमक फलंदाजी केली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी केली. या काळात पंतने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 13वे अर्धशतक तर गिलने सातवे अर्धशतक झळकावले.
मोठा फटका मारण्याच्या नादात पंत LBW आऊट झाला. ईश सोधीने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पंत 59 चेंडूंत आठ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 60 धावा करून बाद झाला. यानंतर भारताचा डाव गडगडला. एकवेळ भारताची धावसंख्या चार विकेटवर 180 धावा होती आणि त्यानंतर 83 धावा करताना टीम इंडियाने शेवटच्या सहा विकेट गमावल्या.
पंत बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजा 14 धावा करून बाद झाला आणि रविचंद्रन अश्विन सहा धावा करून बाद झाला. शुभमन गिलने 146 चेंडूंत सात चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने 90 धावांची खेळी केली. सर्फराज खान आणि आकाश दीप यांना खातेही उघडता आले नाही.
वॉशिंग्टन सुंदरने शेवटी काही मोठे फटके मारले आणि भारताला आघाडी मिळवून दिली. सुंदर 36 चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 38 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. न्यूझीलंडकडून एजाज पटेलने पाच विकेट घेतल्या. तर मॅट हेन्री, ग्लेन फिलिप्स आणि ईश सोधीने प्रत्येकी एक विकेट घेतली.