Shravani Kudale : महाराष्ट्राची सुवर्णकन्या..! NEET परीक्षेत बारामतीची श्रावणी कुदळे देशात पाचवी
Shravani Kudale : देशपातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेत महाराष्ट्राने पुन्हा एकदा ऐतिहासिक आणि दमदार कामगिरी नोंदवली आहे.

Shravani Kudale : बारामती तालुक्यातील श्रावणी कुदळे या विद्यार्थिनीने वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या नीट परीक्षेत देदिप्यमान यश संपादन केले आहे. श्रवणीने ७२० पैकी चक्क ७१० गुणांची कमाई करत देशात पाचवा क्रमांक पटकावला असून, तिच्या या यशाने बारामतीसह संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. (Shravani Kudale)
नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए) १६ जुलै रोजी या नीट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदा या परीक्षेसाठी देशभरातून सुमारे २५ लाख विद्यार्थी बसले होते, ज्यापैकी ११ लाख २१ हजार उमेदवार पात्र ठरले आहेत. गेल्या ९ मे रोजी झालेली मूळ परीक्षा पेपरफुटीच्या आरोपांमुळे १२ मे रोजी रद्द करण्यात आली होती, त्यानंतर २१ जून रोजी ही परीक्षा पुन्हा घेण्यात आली. या सर्व अनपेक्षित घडामोडींनंतरही मानसिक संतुलन ढळू न देता श्रावणीने हे ऐतिहासिक यश मिळवले आहे. (Shravani Kudale)
इयत्ता नववीपासूनच पायाभरणी
आपल्या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना श्रावणी म्हणाली, हे माझे एक स्वप्न होते, जे आज पूर्ण झाले आहे. शालेय जीवनापासूनच मी वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे ठरवले होते. नववीत असतानाच मी नीटच्या तयारीला सुरुवात केली, ज्यामुळे माझा पाया भक्कम झाला. शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण अभ्यास यामुळेच मी इथंपर्यंत पोहोचू शकले. (Shravani Kudale)
पेपरफुटीच्या वादावर सकारात्मक मात
पहिल्या परीक्षेचा पेपर रद्द झाल्याच्या वादावर आणि मानसिक दबावावर बोलताना श्रावणीने अत्यंत परिपक्व उत्तर दिले. माझी पहिली परीक्षाही खूप चांगली झाली होती; पण जेव्हा ती रद्द झाली, तेव्हा मी खचून न जाता पुन्हा नीट परीक्षेकडे एक नवी आणि अधिक चांगली संधी म्हणून पाहिले. पहिलीच्या तुलनेत दुसरी प्रश्नपत्रिकेची काठिण्यपातळीत जास्त होती, तरीही मी आत्मविश्वासाने सामोरी गेले, असे तिने सांगितले. (Shravani Kudale)
माता- पित्यांचा ऊर भरून आला
श्रावणीचे वडील शिक्षक आहेत. मुलीच्या या यशाबद्दल तिचे वडील म्हणाले, ती नक्कीच चांगली कामगिरी करेल, याची आम्हाला खात्री होती. मात्र, ती देशात पाचवी येईल, अशी अपेक्षा आम्ही केली नव्हती. तिच्या कष्टाचे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे हे फळ आहे. देशपातळीवर अव्वल क्रमांकात स्थान मिळवणे सोपे नव्हते; पण श्रावणीच्या जिद्दीने हे शक्य करून दाखवले, अशा शब्दांत तिच्या आईने आपल्या भावना व्यक्त केल्या.(Shravani Kudale)






