Top 10 News : NEET मध्ये लातूर पॅटर्नचा डंका ते जयंत पाटील अर्थमंत्री होणार? वाचा आजच्या टॉप दहा बातम्या
Top 10 News : NEET मध्ये लातूर पॅटर्नचा डंका ते जयंत पाटील अर्थमंत्री होणार? वाचा आजच्या टॉप दहा बातम्या

Top 10 News : 1) NEET मध्ये लातूर पॅटर्नचा पुन्हा डंका; 1200 हून अधिक विद्यार्थ्यांना MBBSची संधी
नीट परीक्षेच्या निकालात लातूर पॅटर्नने पुन्हा एकदा आपला दबदबा सिद्ध केलाय. पेपरफुटीच्या चर्चांदरम्यानही लातूरच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्तेच्या जोरावर घवघवीत यश मिळवले. एकट्या राजर्षी शाहू महाविद्यालयातील 450 हून अधिक विद्यार्थ्यांना एमबीबीएस प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. तर संपूर्ण लातूर जिल्ह्यातून 1200 ते 1500 हून अधिक विद्यार्थी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जातोय. शाहू महाविद्यालयातील 46 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी 600 हून अधिक गुण मिळवले असून, 530 पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 200 पार झाली आहे. या यशामुळे लातूर पॅटर्नची शैक्षणिक परंपरा आणि विश्वासार्हता पुन्हा अधोरेखित झालीय. (Top 10 News)
2) जयंत पाटील अर्थमंत्री होणार? गुप्त भेटींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींची चर्चा रंगलीय. शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याकडे राज्याच्या अर्थमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपचे विनोद तावडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत झालेल्या भेटींनंतर या चर्चांना वेग आलाय. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गट आणि अजित पवार गट पुन्हा एकत्र येण्याच्या हालचाली सुरू असल्याच्याही चर्चा आहेत. मात्र, अर्थमंत्रिपद किंवा राजकीय समीकरणांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांत या घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागलेय. (Top 10 News)
3) डोंबिवलीत 73 वर्षांच्या आजीबाईंना ‘लिव्ह इन’ ची हौस नडली, 57 लाख गेले, बँक खाते रिकामे
डोंबिवलीत 73 वर्षीय ज्येष्ठ महिलेची लिव्ह-इन रिलेशनशिपचे आमिष दाखवून तब्बल 57 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मॅट्रिमोनियल संकेतस्थळावर ओळख झाल्यानंतर आरोपी अनुज तिवारीने विश्वास संपादन करत वैद्यकीय आणि कौटुंबिक कारणे सांगून टप्प्याटप्प्याने पैसे उकळले. पैसे मिळाल्यानंतर त्याने संपर्क तोडल्याने महिलेने विष्णूनगर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीला दिल्लीतून अटक केली. तो उत्तर प्रदेशातील लखनऊचा रहिवासी असून वेगवेगळी नावे वापरून देशभरातील महिलांना जाळ्यात ओढत असल्याचे उघड झाले आहे. या फसवणुकीमुळे पीडित महिलेची आयुष्यभराची जमापुंजी संपली असून तिच्यावर वृद्धाश्रमात जाण्याची वेळ आली आहे. (Top 10 News)
4) बीड बायपासवर भीषण अपघात; दत्त संप्रदायाचे कालिदास महाराज अन् भावजयांचा जागीच मृत्यू,
परभणी जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गुंज येथील दत्त संप्रदायाचे ज्येष्ठ संत कालिदास महाराज यांचे छत्रपती संभाजीनगरजवळील बीड बायपासवर झालेल्या भीषण अपघातात निधन झाले. या दुर्घटनेत त्यांच्या भावजय स्मिता बोरीकर यांचाही जागीच मृत्यू झाला, तर वाहनचालक गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. टेंबे स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रीक्षेत्र गरुडेश्वर येथे दर्शन करून परतत असताना हा अपघात झाला. गेली चार दशके मौनव्रत पाळत कालिदास महाराजांनी अध्यात्म, व्यसनमुक्ती आणि समाजसेवेचा संदेश दिला होता. त्यांच्या निधनाने परभणीसह संपूर्ण मराठवाड्यात शोककळा पसरली असून हजारो भाविकांनी हळहळ व्यक्त केलीय. विविध मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कार्याची आठवण काढली आहे. (Top 10 News)
5) भरधाव ट्रेनची शाळेच्या व्हॅनला धडक, 2 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे भीषण अपघातात भरधाव पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या व्हॅनला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना कर्णसुबर्ण-गोबिंदपूर रेल्वे क्रॉसिंगवर घडली. प्राथमिक माहितीनुसार, रेल्वे फाटक पूर्णपणे बंद नसतानाच व्हॅन चालकाने ट्रॅक ओलांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी निमतिता-काटोया पॅसेंजर ट्रेनने व्हॅनला जोरदार धडक दिली. धडकेनंतर व्हॅनचा चक्काचूर झाला. जखमी विद्यार्थ्यांना प्रथम स्थानिक रुग्णालयात, त्यानंतर मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले. घटनेनंतर पोलीस आणि रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरू केली असून, मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केलीय. (Top 10 News)
6) ट्रेनमध्ये छेड काढणाऱ्या मुलीने तरुणाला दिली अनोखी शिक्षा
अकोला-बडनेरा मार्गावरील भुसावळ-वर्धा पॅसेंजर मेमो ट्रेनमध्ये छेडछाडीच्या प्रकारानंतर एका तरुणीने आरोपीला अनोख्या पद्धतीने धडा शिकवला. प्रवासादरम्यान तरुणाने अश्लील वर्तन करत छेड काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तरुणीने धाडस दाखवत त्याला सर्वांसमोर जाब विचारला. डब्यातील प्रवाशांनीही तिची साथ देत संबंधित तरुणाला पकडले. तरुणीने त्याच्या हातात बांगड्या भरल्या, ओठांवर लिपस्टिक आणि लाली लावत त्याच्या कृत्याचा निषेध व्यक्त केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून नागरिकांकडून तरुणीच्या धाडसाचे कौतुक केले जातेय. (Top 10 News)
7) रशियन तेलावरून भारताला अमेरिकेचा मोठा इशारा; 100% टॅरिफची तयारी?
रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर कठोर व्यापार निर्बंध लावण्याच्या दिशेने अमेरिकेने मोठे पाऊल उचललेय. अमेरिकन सिनेटमध्ये सादर करण्यात आलेल्या प्रस्तावित विधेयकात भारतासह चीन, हंगेरी, स्लोव्हाकिया आणि अझरबैजानसारख्या देशांवर 100 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याची तरतूद असल्याचे वृत्त आहे. या विधेयकाचा उद्देश रशियाच्या ऊर्जा उत्पन्नावर आळा घालून युक्रेन युद्धासाठी मिळणारे आर्थिक पाठबळ कमी करणे हा आहे. हे विधेयक कायद्यात रूपांतरित झाल्यास भारत-अमेरिका व्यापार आणि भारतीय निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मात्र, काही युरोपीय देशांना त्यांच्या ऊर्जा अवलंबित्वाच्या आधारे संभाव्य सूट मिळू शकते. सध्या हे विधेयक चर्चेच्या टप्प्यात असून अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. (Top 10 News)
8) आता शेणावर धावणार गाड्या! गुजरातमध्ये देशातील पहिला बायो-CNG पंप यशस्वी
गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात देशातील पहिला व्यावसायिक बायो-CNG पंप यशस्वी ठरला असून, गुरांच्या शेणापासून तयार होणाऱ्या इंधनावर आता वाहने धावत आहेत. मारुती सुझुकी आणि बनास डेअरी यांच्या संयुक्त उपक्रमातून उभारलेल्या या प्रकल्पात दररोज 600 ते 700 वाहने बायो-CNG भरत आहेत. या इंधनाचा दर प्रतिकिलो 80 रुपये असून तो पेट्रोलपेक्षा स्वस्त आहे. प्रकल्पासाठी 16 गावांतून दररोज 88 टन शेण गोळा केले जाते. शेतकऱ्यांना शेणासाठी प्रतिकिलो 1 रुपया मिळत असल्याने अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग खुला झालाय. गॅस निर्मितीनंतर उरणारे शेण सेंद्रिय खत म्हणूनही वापरले जात आहे. हा प्रयोग स्वच्छ ऊर्जा, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि इंधन स्वावलंबनासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जातोय. (Top 10 News)
9) चर्चा ‘खाशाबा’ची… पण नागराज मंजुळेंचा ‘फ्रेम’ OTT वर घालतोय धुमाकूळ
नागराज मंजुळे यांच्या बहुचर्चित ‘खाशाबा’ सिनेमाची चर्चा सुरू असतानाच त्यांचा ‘फ्रेम’ हा चित्रपट ओटीटीवर धुमाकूळ घालतोय. १० जुलै रोजी झी फाइव्हवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या आठवड्यात टॉप ट्रेंडिंग सिनेमांच्या यादीत चौथे स्थान मिळवलेय. फोटो जर्नालिस्टच्या आयुष्यातील व्यावसायिक जबाबदारी आणि माणुसकीतील संघर्षावर आधारित ही कथा प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडते. विक्रम पटवर्धन दिग्दर्शित या चित्रपटात नागराज मंजुळे, अमेय वाघ, मुग्धा गोडसे आणि अक्षया गुरव यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक होत आहे. विशेष म्हणजे, चित्रपटाचा धक्कादायक शेवट प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवत असून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा रंगलीय. (Top 10 News)
10) रोहित शर्माच्या वनडे कारकिर्दीचा अंत? लॉर्ड्सवर खेळणार शेवटचा सामना!
कसोटी आणि टी-२० मधून निवृत्त झालेला ३९ वर्षीय रोहित शर्मा रविवारी इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर आपला शेवटचा वनडे सामना खेळण्याची शक्यता आहे. २०२७ च्या विश्वचषकापर्यंत रोहितचे वय ४० पार होणार असल्याने, निवड समितीने प्रशिक्षक गौतम गंभीरच्या संमतीने रोहितऐवजी युवा यशस्वी जैस्वालला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनुसार, बीसीसीआयने रोहितला या मालिकेनंतर संघातून वगळण्याचा स्पष्ट निरोप दिला आहे. २०२६ मध्ये ८ वनडेत केवळ ३० च्या सरासरीने २४१ धावा करणारा रोहित या निर्णयावर कमालीचा नाराज असल्याचे समजते. (Top 10 News)





