Neetu Kapoor: वयाच्या पाचव्या वर्षी सुरू झाला प्रवास; नावही नव्हतं पडद्यावर, पण नीतू कपूर बनल्या बॉलिवूडच्या सुपरस्टार
Neetu Kapoor चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यानंतर त्यांचे मूळ नाव हरनीत कौर बदलून 'बेबी सोनिया' असे ठेवण्यात आले. बालकलाकार म्हणून त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि या नावानेच त्या लोकप्रिय झाल्या.

Neetu Kapoor: हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर आज आपला ६६ वा वाढदिवस साजरा करत आहेत. गेली सहा दशके आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या नीतू कपूर यांचा प्रवास जितका यशस्वी आहे, तितकाच तो संघर्षमयही आहे. बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या नीतू यांनी अनेक अडचणींवर मात करत बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
८ जुलै १९५८ रोजी दिल्लीतील जाट शीख कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव हरनीत कौर असे होते. लहान वयातच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे कुटुंबावर मोठे संकट आले. त्यानंतर त्यांची आई संपूर्ण कुटुंबासह मुंबईत स्थायिक झाली. याच शहरातून नीतू यांच्या अभिनय प्रवासाला सुरुवात झाली.
नीतू फक्त पाच वर्षांच्या असताना प्रसिद्ध अभिनेत्री वैजयंतीमाला यांची नजर त्यांच्यावर पडली. त्यांच्या चेहऱ्यातील निरागसता आणि अभिनयाची क्षमता पाहून वैजयंतीमाला यांनी दिग्दर्शक टी. प्रकाश राव यांना नीतू यांचे नाव सुचवले. त्यानंतर १९६६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सूरज’ या चित्रपटात त्यांना संधी मिळाली. मात्र, या चित्रपटात काम करूनही पडद्यावर त्यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला नव्हता. अभिनय केला, पण श्रेय मात्र मिळाले नाही.
चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यानंतर त्यांचे मूळ नाव हरनीत कौर बदलून ‘बेबी सोनिया’ असे ठेवण्यात आले. बालकलाकार म्हणून त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि या नावानेच त्या लोकप्रिय झाल्या. ‘दस लाख’ या चित्रपटानंतर ‘दो कलियां’ या चित्रपटामुळे त्यांना मोठी ओळख मिळाली. या चित्रपटातील दुहेरी भूमिका आणि ‘बच्चे मन के सच्चे’ हे गाणे प्रचंड गाजले. त्यामुळे बेबी सोनिया हे नाव घराघरात पोहोचले.

Neetu Kapoor
यानंतर त्यांनी बालकलाकार म्हणून अनेक चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला. जसजशा त्या मोठ्या झाल्या, तसतसे मुख्य अभिनेत्री म्हणून त्यांचे करिअर सुरू झाले. ‘रिक्शावाला’ या चित्रपटातून त्यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. या चित्रपटात त्यांच्यासोबत रणधीर कपूर मुख्य भूमिकेत होते. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. तरीही नीतू यांच्या अभिनयाचे कौतुक झाले.
यानंतर ‘यादों की बारात’ या चित्रपटाने त्यांच्या करिअरला मोठी कलाटणी दिली. या चित्रपटानंतर त्यांनी एकामागून एक अनेक यशस्वी चित्रपट दिले आणि त्या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्री बनल्या. आपल्या सहज अभिनयामुळे आणि गोड स्मितहास्यामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचे स्थान मिळवले.
नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन जोडीही खूप लोकप्रिय होती. जवळपास पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर १९८० मध्ये दोघांनी विवाह केला. लग्नानंतर करिअरच्या सर्वोच्च टप्प्यावर असतानाच नीतू यांनी चित्रपटसृष्टीला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. १९८३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘गंगा मेरी मां’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.
लग्नानंतर त्यांनी पूर्ण वेळ कुटुंबाला दिला. मुलगा रणबीर कपूर आणि मुलगी रिद्धिमा कपूर यांच्या संगोपनासाठी त्यांनी अभिनयापासून दूर राहणे पसंत केले. जवळपास २५ वर्षांच्या विश्रांतीनंतर त्यांनी ‘लव्ह आज कल’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले. त्यानंतर ‘जुग जुग जिओ’सारख्या चित्रपटांमधून त्यांनी पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची छाप पाडली.
आजही नीतू कपूर यांचा संघर्ष, मेहनत आणि यशाचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी मानला जातो. बालकलाकार म्हणून श्रेय न मिळालेल्या एका छोट्या मुलीपासून बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्रीपर्यंतचा त्यांचा प्रवास खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे.





