Pune News : सुप्यात दोन महिलांच्या खूनप्रकरणी आरोपीला अटक; चोरीचे सोन्याचे दागिने जप्त
Pune News : बारामती तालुक्यातील सुपा परिसरातील शेरेवाडी येथे सोन्याच्या दागिन्यांसाठी दोन वृद्ध महिलांचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती.

Pune News : सुपा परिसरातील शेरेवाडी येथे सोन्याच्या दागिन्यांसाठी दोन महिलांचा खून केल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. विकास उर्फ अप्पा राजेंद्र लडकत (वय २५, रा. शेरेवाडी, ता. बारामती) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून, सुपा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. (Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदुमती मारुती लडकत (वय ७५) आणि त्यांची चुलत बहीण कृष्णाबाई कुंडलीक लडकत (वय ५५) यांचा खून झाला होता. दोघी घरासमोरील ओट्यावर झोपलेल्या असताना आरोपीने त्यांच्या अंगावरील सुमारे सहा लाख रुपये किमतीचे पाच तोळे सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले. (Pune News)
त्यानंतर त्यांच्या मानेवर आणि गळ्यावर वार करण्यात आले. याप्रकरणी गणेश मारुती लडकत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २९ सप्टेंबर २०२६ रोजी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (Pune News)
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी तातडीने तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा, सुपा, दौंड, बारामती शहर आणि बारामती तालुका पोलिसांची आठ पथके तयार करण्यात आली. (Pune News)
पथकांनी घटनास्थळाच्या आसपासच्या परिसरातील तसेच पंचक्रोशीतील सीसीटीव्ही चित्रण तपासले. अशाच स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती घेण्यासाठी अहिल्यानगर, सोलापूर, सातारा, बीड, कोल्हापूर आणि निपाणी येथे जाऊन दोनशेहून अधिक रेकॉर्डवरील आरोपींची पडताळणी करण्यात आली. स्थानिक गुन्हेगार आणि परिसरातील संशयितांच्या हालचालींवरही लक्ष ठेवण्यात आले. (Pune News)
तपासादरम्यान शेरेवाडीतील एका व्यक्तीच्या संशयास्पद हालचाली निदर्शनास आल्याने विकास लडकत याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने सोन्याचे दागिने चोरून दोन्ही महिलांचा कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. (Pune News)
फिर्यादीच्या घराजवळ राहणाऱ्या नागरिकांकडूनही पथकांनी माहिती घेतली. या माहितीच्या आधारे संशयितांची पडताळणी करण्यात आली. आरोपीकडून जप्त केलेल्या दागिन्यांबाबत आणि गुन्ह्याच्या इतर बाबींबाबत सुपा पोलीस अधिक तपास करीत आहे. (Pune News)
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, डॉ. शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, बारामती शहरचे पोलीस निरीक्षक शैलेश चिवडशेट्टी आणि सुपा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके यांच्यासह विविध पथकांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तपासात सहभाग घेतला. (Pune News)





