Navratri 2025 | यंदा नवरात्र दहा दिवसांची! जाणून घ्या तिथी वृद्धीचे कारण
प्रभात वृत्तसेवा
पुणे – शारदीय नवरात्रोत्सवाला सोमवारी (२२ सप्टेंबर) घटस्थापनेने सुरुवात होत असून, तिथीच्या वृद्धीने यंदा नवरात्र दहा दिवसांची आहे. या वर्षी नवरात्र २२ सप्टेंबर ते एक ऑक्टोबर असे दहा दिवस असून प्रत्येक घरी कुलाचारानुसार घटस्थापना करून पारंपरिक पद्धतीने नवरात्रोत्सव साजरे होईल.अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून शारदीय नवरात्र सुरू होते. या वर्षी २२ सप्टेंबर रोजी नवरात्रारंभ होत असून, याच दिवशी घरोघरी घटस्थापना होईल. साधारणपणे नवरात्र नऊ दिवसांची असते.
परंतु, तिथीच्या क्षय-वृद्धीमुळे कधी ते आठ, तर कधी दहा दिवसांची होऊ शकते. या वर्षी तृतीया तिथीची वृद्धी झाल्याने नवरात्र दहा दिवसांची असणार आहे. गेल्या वर्षीही तृतिया वृद्धीतिथी असल्याने नवरात्र दहा दिवसांची होती, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली. नवरात्रामध्ये देवीचा टाक किंवा मूर्तीची वेगळी स्थापना करून पूजा केली जाते.
नवरात्रातील प्रमुख दिवस
-ललिता पंचमी : शुक्रवार, २६ सप्टेंबर
-महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) : सोमवार २९ सप्टेंबर
-दुर्गाष्टमी, श्रीसरस्वती पूजन, महाष्टमी उपवास : मंगळवार ३० सप्टेंबर
-महानवमी, नवरात्रोत्थापन : बुधवार १ ऑक्टोबर
-विजयादशमी (दसरा) : गुरुवार २ ऑक्टोबर (विजय मुहूर्त : दुपारी २.२७ ते ३.१५)
उपवास कधी करावा?
नवरात्रामध्ये देवीला दररोज एक माळ अर्पण करताना जितक्या दिवसांची नवरात्र असेल, तेवढ्या माळा अर्पण कराव्यात. तिथी वृद्धी असल्याने दोन दिवसांच्या दोन स्वतंत्र माळा अर्पण कराव्यात असे सांगण्यात आले.





