प्रभात वृत्तसेवा पुणे – आदिशक्तीची पूजा बांधणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवास आज, सोमवारपासून (२२ सप्टेंबर) सुरुवात होत असून ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मंदिरांसह विविध मंदिरांमध्ये सकाळी पारंपरिक पद्धतीने घटस्थापना होईल. नवरात्रोत्सवासाठी मंदिरांची रंगरंगोटी झाली असून फुलांची सजावट, विद्युत रोषणाईने शहर उत्सवमय झाले आहे.भाविकांच्या सुरक्षतेसाठी मंदिरांच्या आवारात उपाययोजना केली आत. उत्सवकाळात पूजा, अभिषेक, भजन, श्रीसुक्त पठण, देवीचा जागर आणि गोंधळ आदी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान, कन्यापूजन, सामाजिक संस्थांमध्ये भोंडला असे कार्यक्रम होत आहेत. पुण्याची ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी मंदिरात सोमवारी पहाटे साडेपाच वाजता रोहित बेंद्रे यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. तत्पूर्वी देवीला अभिषेक होईल. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत खुले असेल. दररोज देवी विविध रूपांमध्ये आणि विविध वाहनांवर आरूढ असेल.बुधवार पेठेतील श्री काळी जोगेश्वरी मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीने शारदीय नवरात्रोत्सव साजरा होत आहे. दररोज सकाळी षोडशोपचार पूजा, सप्तशती पाठ, श्रीसुक्त पठण, जोगवा, नवचंडी होम, असे कार्यक्रम होतील. देवी दररोज वेगवेगळ्या वाहनावर आरूढ होणार आहे. सकाळी नऊ आणि रात्री आठ वाजता आरती होईल.शुक्रवार पेठेतील पिवळी जोगेश्वरी मंदिरात विधीवत घटस्थापना आणि पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा होईल. भवानी पेठेतील श्री भवानी देवी मंदिरात सकाळी सहा वाजता महारुद्राभिषेक आणि महापूजा होणार आहे. त्यानंतर तुकाराम दैठणकर यांचे सनईवादन होणार असून, सकाळी अकरा वाजता घटस्थापना होणार आहे. उत्सवकाळात दररोज ललिता सहस्रनाम पठण, श्रीसुक्त पठण होणार असून, दिवसभर विविध भजनी मंडळे सेवा रुजू करतील. सातारा रस्त्यावरील पद्मावती देवी, तळजाई माता देवस्थान, कर्वेनगर येथील वनदेवी अशा विविध मंदिरांमध्ये देवीचा जागर होणार आहे.