प्रभात वृत्तसेवा पुणे – नवले पुलावर गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातास जबाबदार असलेल्या ट्रकचालकासह तिघांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अपघातास जबाबदार असणाऱ्या ट्रक चालकासह क्लिनरचा होरपळून मृत्यू झाला.याप्रकरणी ट्रकचालक रुस्तम रूदार खान (३५, रा. किरवारी, किसनगड, जि. खेरतल, राजस्थान), मदतनीस (क्लिनर) मुस्ताक हनीफ खान (३१, रा. मनापुरी, रासगड, जि. अलवर, राजस्थान), ताहीर नासीर खान (४५, रा. किसनगड, राजस्थान) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मधुकर तुुपसौंदर यांनी सिंहगड रस्ता पोलिसांत फिर्याद दिली आहे. अपघातात ट्रकचालक रुस्तम खान, क्लिनर मुस्ताक खान यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ताहीर खान गंभीर होरपळला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. ट्रक चालकासह तिघांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम १०५, २८१, १२५ (अ), (ब), ३२४ (४), मोटार वाहन कायदा कलम १८४, ११९, १७७ अन्वये गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून आणि ब्रेक नादुरुस्त होऊन नवले पुलाजवळ गुरुवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. कंटेनरने १० ते १२ वाहनांना धडक दिल्यामुळे लागलेल्या आगीत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर १५ ते १६ जण गंभीर जखमी झाले. हा अपघात गुरुवारी (१३ नाेव्हेंबर) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सेल्फी पॉइंटजवळ झाला. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या जवानांसह सिंहगड रस्ता पोलीस, वाहतूक पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. कंटेनर साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. नवले पुलावरील सेल्फी पॉइंटजवळ कंटेनरचे ब्रेक निकामी झाले. त्याने समोरच्या जवळपास छोट्या मोठ्या मिळून १० ते १२ वाहनांना उडवल्यामुळे वाहनांना आग लागली. दोन कंटेनरच्या धडकेत मोटार चेपल्यामुळे आतील प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. त्यामुळे त्यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. कंटेनरसह इतर वाहनांतील मिळून आठ जणांचा मृत्यू झाला. भरधाव वेग आणि ट्रकचालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. वाचवा वाचवाचा टाहो… कंटेनरचालकाने अनेकवाहनांना धडक दिल्यामुळे आग लागली होती. चालकांसह प्रवासी गाडीतच अडकल्यामुळे ते मदतीसाठी आरडाओरडा करीत होते. मात्र, आगीचे लोट मोठ्या प्रमाणावर पसरल्यामुळे कोणालाच त्यांच्या मदतीसाठी पुढे जाता येत नव्हते. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचेपर्यंत वाहनांतील प्रवाशांचा मृत्यू झाला होता. सिंहगड रस्ता पोलीस, वाहतूक पोलीस, स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. सीसीटीव्हीची तपासणी नवले पुलावर नेमका अपघात कसा झाला, यादृष्टीने तपास सुरू आहे. ट्रकचालकाने मद्यप्राशन केले होते का?, यादृष्टीने तपास सुरू आहे. भरधाव वेगामुळे नियंत्रण सुटल्याने ट्रकने एकापाठोपाठ वाहनांना धडक दिली असून, पोलिसांनी नवले पूल परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे.