Navale Bridge : नवले पूल मार्गावर जड वाहनांसाठी वेगमर्यादा २४ नोव्हेंबरपासून लागू होण्याची शक्यता

प्रभात वृत्तसेवा
पुणे – स्वामी नारायण मंदिर ते नवले पूल दरम्यानच्या तीव्र उताराचा विचार करून या मार्गावरून जाणाऱ्या जड वाहनांसाठी वेगमर्यादा ६० किमी प्रतितासवरून ३० किमी प्रतितास करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा नवीन नियम आगामी आठवड्यात, शक्यतो २४ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे.निर्णयानंतर एनएचएआयने या मार्गावर रम्बलर्स व स्पीड स्ट्रीप्स बसविण्याची कामे सुरू केली आहेत.
पुढील टप्प्यात वेगमर्यादेच्या फलकांची उभारणी केली जाईल. त्यानंतर पुणे शहर वाहतूक शाखेकडून अधिकृत नोटिफिकेशन जारी केले जाईल. अंमलबजावणीनंतर स्पीड गन्सद्वारे तपासणी केली जाईल आणि वेगमर्यादा मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे.शनिवारी झालेल्या संयुक्त बैठकीत नवले पूल परिसरातील त्रुटी तातडीने दूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर एनएचएआय आणि पुणे पोलिसांनी स्थळावरच सुधारणा कामांना सुरुवात केली आहे.
दरम्यान, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर जागेवरच दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय, पुणे-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील खेड-शिवापूर टोलनाक्यावर जड वाहनांची विशेष तपासणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ट्रक किंवा कंटेनरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक माल आढळल्यास तो जागेवरच उतरवण्याचा कठोर निर्णयही बैठकीत घेण्यात आला.





