National Sports Day: पुण्याच्या कुस्तीचा ‘राष्ट्रीय’ वारसा
National Sports Day: १९४७ मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय तालीम संघाचे पुण्यातील कुस्ती परंपरेला संघटित रूप देण्यात आणि हजारो पैलवानांना व्यासपीठ मिळवून देण्यात मोठे योगदान.

National Sports Day: पुण्याच्या क्रीडा इतिहासात कुस्तीला केवळ एक खेळ म्हणून पाहिले जात नाही, ती या राज्याच्या मातीत रुजलेली परंपरा आहे. आखाड्यातील माती, पहाटेचा सराव, वस्तादांचे मार्गदर्शन आणि मैदानात पैलवानाला मिळणारी दाद, या सगळ्यांनी पुण्याच्या कुस्तीची स्वतंत्र ओळख निर्माण केली. या परंपरेला संघटित स्वरूप देत अनेक पिढ्यांतील पैलवानांना व्यासपीठ मिळवून देणार्या संस्थांमध्ये राष्ट्रीय तालीम संघाचे स्थान अग्रक्रमाचे आहे.
36 वर्षांत जवळपास सात हजार मैदाने
राष्ट्रीय तालीम संघाच्या कामाचा आवाका लक्षात घेण्यासाठी एक आकडा पुरेसा ठरतो. 1947 ते 1983 या सुमारे 36-37 वर्षांच्या कालावधीत संघाच्या मान्यतेने तब्बल 6,929 कुस्तीची मैदाने भरविण्यात आली. म्हणजेच वर्षाला सरासरी सुमारे 188 मैदाने..!! आशिया खंडातील कोणत्याही शहरात किंवा संस्थेने एवढ्या मोठ्या प्रमाणावर कुस्तीची मैदाने भरविली नसल्याचा दावा संघाच्या इतिहासात करण्यात आला आहे.
त्यामुळे राष्ट्रीय तालीम संघाची ही कामगिरी पुण्याच्या कुस्ती संस्कृतीची व्याप्ती आणि संघटनेची ताकद दाखवून देते. ही केवळ मैदाने नव्हती. प्रत्येक मैदानातून एखादा पैलवान पुढे येत होता, एखाद्या वस्तादाची तालीम उजळत होती आणि पुण्याच्या कुस्ती परंपरेला नवी पिढी मिळत होती. मात्र, आता काळ बदलला, आणि मॅट आली. मॅट आल्यामुळे खेळ जास्त वेगवान झाला.
त्यामुळे नव्या तालमींमध्येही मॅटचा आखाडा तयार करण्यात येत आहे; परंतु ज्या मूळ मातीच्या तालमींमध्ये मॅट लावणे अजूनही शक्य होत नव्हते, म्हणूनच राष्ट्रीय तालीम संघाने पुढाकार घेऊन मॅटचा आधुनिक आखाडा तयार केला आहे. 1947 मध्ये स्थापना झालेल्या या संस्थेने गेल्या अनेक दशकांत केवळ कुस्तीची मैदाने भरवली नाहीत, तर पुण्याच्या कुस्ती संस्कृतीला आकार देण्याचे काम केले.
संस्थेच्या वाटचालीत अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, वस्ताद आणि पैलवानांचे योगदान राहिले. त्यातूनच राष्ट्रीय तालीम संघाचा इतिहास हा पुण्याच्या कुस्तीच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. राष्ट्रीय तालीम संघाच्या स्थापनेत पुण्याचे तत्कालीन नगराध्यक्ष बाबुराव सणस यांचे योगदान महत्त्वाचे होते. 1947 ते 1970 या कालावधीत त्यांनी संस्थेचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने आपली पायाभरणी मजबूत केली आणि पुण्यात कुस्तीला संघटित व्यासपीठ मिळवून दिले.
त्यानंतर 1970 मध्ये नामदेवराव मते, कै. गुलाबराव घुले, कै. नारायणराव पवार, वस्ताद गुलाबराव सोनावणे, कै. दामोदर टकले, हिंदकेसरी पै. योगेश दोडके व विद्यमान अध्यक्ष श्री. तात्यासाहेब भिंताडे यांच्या नेतृत्वाचा काळ राष्ट्रीय तालीम संघाच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरला. कुस्तीची मैदाने वाढविण्याबरोबरच पैलवानांना अधिक चांगले व्यासपीठ मिळावे, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
याच प्रयत्नांतून साकारले ते छत्रपती शिवाजी स्टेडियम. राष्ट्रीय तालीम संघाची कार्यकारिणी पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 60 हून अधिक तालीम व कुस्ती संकुलाचे प्रतिनिधी म्हणून 40 सदस्यांची कार्यकारिणी कार्यरत आहे. अध्यक्ष म्हणून श्री. तात्यासाहेब भिंताडे व सरचिटणीस म्हणून श्री. शिवाजीराव बुचडे कार्यरत आहेत.
आखाड्यापासून स्टेडियमपर्यंतचा प्रवास
पुण्यातील कुस्तीची सुरुवात विविध ठिकाणच्या आखाड्यांपासून झाली. चिंचवडबाग, किर्लोस्कर थिएटर आणि डेक्कन जिमखाना अशा ठिकाणी कुस्तीची मैदाने भरत असत. पुढे पुणे महानगरपालिकेने नदीकाठी शिवाजी आखाडा उभारला. मात्र, 1961 च्या पुरात हा आखाडा वाहून गेला. त्यानंतर कुस्तीच्या मैदानांसाठी उपलब्ध जागेचा प्रश्न अधिक तीव्र झाला. डेककन जिमखान्यावर होणार्या कुस्तीच्या सामन्यांमध्येही जागेची अडचण होती.
प्रेक्षकांना कुस्ती व्यवस्थित पाहता येत नसल्याने अनेकदा वातावरण तणावपूर्ण होत असे. या परिस्थितीत कुस्तीला कायमस्वरूपी आणि प्रशस्त मैदान मिळाले पाहिजे, असा विचार पुढे आला. नामदेवराव मते यांनी हा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी पुढाकार घेतला. महाराष्ट्र शासन, पुणे महानगरपालिका आणि किर्लोस्करसारख्या उद्योगसमूहांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी स्टेडियम उभारणीचा मार्ग मोकळा झाला. 1 नोव्हेंबर 1970 रोजी स्टेडियमच्या भूमिपूजनाचा समारंभ झाला. महाराष्ट्राचे अर्थ व क्रीडामंत्री बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्या हस्ते हा सोहळा झाला.
उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर अध्यक्षस्थानी होते. पुणे महानगरपालिकेचे पदाधिकारी, राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष नामदेवराव मते आणि संस्थेचे अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पुढे 28 डिसेंबर 1974 रोजी छत्रपती शिवाजी स्टेडियमचा नामकरण सोहळा झाला. भारताचे परराष्ट्रमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते हा समारंभ झाला, तर महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री शरदचंद्र पवार अध्यक्षस्थानी होते. अशा प्रकारे पुण्याच्या कुस्तीला स्वतःचे एक महत्त्वाचे केंद्र मिळाले.
पुढची तालीम कशासाठी?
काळ बदलला, कुस्तीचे स्वरूप बदलले आणि प्रशिक्षणाच्या पद्धतीही बदलल्या. पारंपरिक आखाड्याबरोबर आता आधुनिक व्यायामशाळा, आहारतज्ज्ञ, फिटनेस ट्रेनिंग, वैज्ञानिक प्रशिक्षण आणि स्पर्धात्मक नियोजन यांची गरज निर्माण झाली आहे. राष्ट्रीय तालीम संघाचे विद्यमान अध्यक्ष तात्यासाहेब भिंताडे यांच्यासाठी पुढील काळातील सर्वात मोठे ध्येय आहे, कुस्तीसाठी आणखी योगदान देणे आणि नव्या पिढीतील खेळाडू घडविणे. स्पर्धा आणि उपक्रम होत असले तरी पुणे महानगरपालिकेने कुस्तीच्या पायाभूत सुविधांसाठी आणखी पुढाकार घेण्याची गरज आहे.
आखाडे, प्रशिक्षण सुविधा, मैदानांची देखभाल, युवा खेळाडूंसाठी शिबिरे आणि आधुनिक प्रशिक्षणाची साधने उपलब्ध झाली तर पुण्यातून आणखी मोठ्या स्तरावरील पैलवान घडू शकतात. संघाचे विद्यमान सरचिटणीस शिवाजीराव बुचडे यांच्याही अपेक्षा याच दिशेने आहेत. कुस्तीला राजाश्रय मिळत असला, तरी अजूनही अनेक पातळ्यांवर सुधारणा आवश्यक असल्याचे ते मानतात. राज्य शासनाने प्रशिक्षण, पायाभूत सुविधा, खेळाडूंच्या आर्थिक मदतीपासून स्पर्धांच्या आयोजनापर्यंत अधिक व्यापक धोरण आखावे, अशी त्यांची अपेक्षा आहे.
परंपरेतून भविष्याकडे
राष्ट्रीय तालीम संघाची कहाणी म्हणजे केवळ एका संस्थेची वाटचाल नाही. ती पुण्याच्या कुस्तीने काळानुसार केलेल्या बदलांची कहाणी आहे. चिंचेंच्या बागेतील मैदाने, किर्लोस्कर थिएटर, डेक्कन जिमखाना, शिवाजी आखाडा आणि पुढे छत्रपती शिवाजी स्टेडियम… या प्रत्येक टप्प्याने पुण्याच्या कुस्तीला नवे व्यासपीठ दिले. आज आव्हाने वेगळी आहेत. पैलवान घडविण्यासाठी केवळ मातीचा आखाडा पुरेसा राहिलेला नाही, त्याला आधुनिक प्रशिक्षण, योग्य आहार, वैद्यकीय सुविधा, स्पर्धेचा अनुभव आणि आर्थिक पाठबळाचीही गरज आहे.
पण राष्ट्रीय तालीम संघाचा मूळ ध्यास अजूनही तोच आहे, तो म्हणजे ‘पैलवान’ घडविणे. 75 वर्षांहून अधिक काळाच्या या प्रवासात पिढ्या बदलल्या, चेहरे बदलले, कुस्तीचे तंत्र बदलले. मात्र, आखाड्यात उतरणार्या पैलवानाच्या डोळ्यातील जिद्द आणि त्याला घडविण्याची तळमळ कायम राहिली. आता या समृद्ध वारशाला आधुनिकतेची जोड देत पुढच्या पिढीसाठी नवे मैदान तयार करणे, हेच राष्ट्रीय तालीम संघासमोरील खरे आव्हान आहे. कारण, कुस्तीचा वारसा जपायचा असेल, तर केवळ इतिहास सांगून चालणार नाही… त्या इतिहासातून उद्याचा पैलवान घडवावा लागेल.
– दिपक पवार







